शिक्रापूर -येथील एका हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी कारवाई केल्यानंतर शिक्रापूर पोलीस खडबडून जागे झाले आहेत. शिक्रापूर पोलिसांनी सहा ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई केली आहे.
शिक्रापूर-चाकण रस्त्यालगत असलेल्या साई करुणा हॉटेल येथे दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी कारवाई करून दारू जप्त केली होती.
या कारवाईनंतर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस नाईक अनिल जगताप, हेमंत इनामे, किशोर शिवणकर, प्रताप कांबळे, आनंदा बाठे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापासत्र सुरू केले. सणसवाडी येथील भैरवनाथ मंदिराजवळ, चाकण रोड चौफुला हॉटेल ग्रीन पॉइंट, शिक्रापूर येथील हॉटेल गंधर्व, सणसवाडी येथील हॉटेल श्रद्धा, धामारी व तळेगाव ढमढेरे येथे कारवाई करत एकूण 28 हजार 400 रुपयांची दारू जप्त केली.
अनुक्रमे सुनील शामराव सरदार (रा. सणसवाडी), संदीप वसंत गायकवाड (रा. काळूस ता. खेड), तानाजी मनदेव मोरे (रा. कळमकर वस्ती, शिक्रापूर), रोहन दत्तात्रय ढमढेरे (रा. तळेगाव ढमढेरे), चंद्रकांत नामदेव गायकवाड (रा. धामारी, ता. शिरूर), भीमराज बाबुराव ढमढेरे (रा. काटेआळी, तळेगाव ढमढेरे) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
पाबळला मटका अड्डयावर छापा
शिक्रापूर -पाबळ (ता. शिरूर) येथील पोलीस दूरक्षेत्र शेजारीच असलेल्या एका ठिकाणी मटका सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना मिळाली. त्यांच्या पथकाने छापा टाकत सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रशांत अंकुश गायकवाड, दत्तात्रय रघुनाथ बगाटे, मुनीर बाबूलाल इनामदार (तिघे रा. पाबळ)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.