महाराणी वेबसिरीजमध्ये हुमा कुरेशी रानी भारती नावाची ल्यक्तिरेखा साकारत आहे, मुख्यमंत्री असलेला पती घोटाळ्यात तुरुंगात गेल्यावर तिच्यावर मुख्यमंत्री बनण्याची वेळ येते.
मात्र या रोलमुळे बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांची आठवण अगदी स्वाभाविकपणे येऊ शकते. पण ही त्याची कथा नाही. वेबसिरीज जशी जशी पुढे सरकत जाईल, तसा याचा उलगडा होत जाईल.
मुख्यमंत्री झालेली रानी भारती स्वतः कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघड करते. बिहारमधील गुन्हेगारीला या वेबसिरीजमध्ये जसेच्या तसे दाखवले आहे. म्हणूनही या वेबसिरीजवर बिहारची छाप असल्यासारखे जाणवते.
दिवसा ढवळ्या कसे खून केले जात होते, त्यावरून बिहारचे नाव क्राईम स्टेट कसे पडले हे पडद्यावर बघून या मालिकेची कहाणी आपल्याला वास्तवाशी जोडते. काल्पनिक असली तरी त्याचे वर्तमानाशी असलेले नाते, लगेच लक्षात येते.
अशाच स्वरुपाच्या प्रतिक्रीया प्रेक्षकांनी द्यायला सुरुवात केली आहे. काहींना तर राबडी देवींचे गोडवे गाण्यासाठीच ही वेबसिरीज बनवली गेल्याचा काही प्रेक्षकांचा आरोप आहे. यातून महिला सशक्तीकरणाचा संदेश तर दिला जात नाही ना अशा शक्यताही काही प्रेक्षक व्यक्त करायला लागले आहेत.