मुंबई – शिवसेनेवर हक्क सांगण्यासाठी ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असा सामना आधीपासूनच सुरू झाला आहे. आता दोन दसरा मेळावे आणि मुंबईतील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गट सज्ज झाले आहेत. त्यातून त्यांच्यातील सामन्याची रंगत आणखीच वाढणार आहे.
दसरा मेळाव्यांसाठी अधिकाधिक गर्दी जमवून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी दोन्ही गटांनी चालवली आहे. त्या मेळाव्यांत दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर शाब्दिक बाण सोडतील.
महिनाभराने होणारी विधानसभा पोटनिवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठीच्या प्रचाराचा नारळच एकप्रकारे मेळाव्यांमधून फोडला जाईल. त्यानंतर नोव्हेंबरच्या प्रारंभी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गट आपली शक्ती पणाला लावतील. ती पोटनिवडणूक दोन्ही गटांच्या लोकप्रियतेची चाचपणी करणारी पहिला परीक्षा ठरणार आहे.