बंगळुरू – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सोमवारी कर्नाटकातील म्हैसूरमध्ये दाखल झाल्या. त्या गुरूवारी पक्षाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. कॉंग्रेस नेते आणि सोनियांचे पुत्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील यात्रा सध्या कर्नाटक मुक्कामी आहे. दोन दिवसांच्या विश्रामानंतर ती यात्रा गुरूवारी सकाळी पुढील मार्गक्रमण करेल. त्यावेळी सोनिया यात्रेत सहभागी होतील.
मागील काही काळातील निवडणुकांच्या प्रचारात प्रकृतीच्या कारणास्तव सोनिया सहभागी झाल्या नव्हत्या. त्या प्रदीर्घ काळानंतर यात्रेच्या माध्यमातून पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यातून कॉंग्रेस यात्रेला आणि कर्नाटकला देत असलेले महत्व अधोरेखित होत आहे.
भाजपशासित कर्नाटकात मे 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होईल. ती निवडणूक अवघ्या सात-आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. कर्नाटकमधील रणधुमाळीला ताकदीने सामोरे जाण्यासाठी कॉंग्रेस पक्ष सज्ज होत आहे. त्यामुळे सोनियांच्या यात्रेतील सहभागाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सोनिया आणि राहुल यांच्या एकत्रित उपस्थितीने कर्नाटकमधील कॉंग्रेसजनांचा उत्साह दुणावणार आहे.