अकोले – विप्रो फाउंडेशनतर्फे झालेल्या अर्थियन पुरस्कार वितरण समारंभात विमानप्रवासाची गोष्ट याचा इंग्रजी अनुवाद केलेले अ फ्लाइट वेल डिझर्व्ह या पुस्तकाचे प्रकाशन विप्रोचे बोर्ड कमिटी सदस्य पी. एस. नारायण अझीम प्रेमजी फाउंडेशनचे सीईओ अनुराग बेहर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी विप्रोचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी यांच्यासह विजेते विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. विमानप्रवासाची गोष्ट हे पुस्तक अ फ्लाइट वेल डिझर्व्ह : बहिरवाडी टू बंगळूरू या नावाने इंग्रजीत अनुवादित झाले आहे. नाशिक येथील आनंद निकेतन शाळेच्या प्रयोगशील शिक्षिका लेखिका सरिता गोसावी यांनी मराठी पुस्तकाचा भाव इंग्रजीत उतरविला आहे.
विप्रो आर्थियन हा शाळा व महाविद्यालयांसाठी भारतातील सर्वांत मोठा शाश्वतता उपक्रम आहे. जैवविविधता, पाणी कचरा यापैकी एक विषय घेऊन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी त्यावर कृतीयुक्त अध्ययन करत प्रकल्प तयार करायचे असतात. प्रकल्प पाठवल्यानंतर विप्रोकडून देशभरातील सर्वोत्तम वीस प्रकल्पांची निवड होऊन आर्थियन पुरस्कार जाहीर होतो.शिक्षक भाऊसाहेब कासार यांनी अक्षदा गोरडे, पूनम काळे, शांताराम पथवे, आदित्य कासार, प्रणव चासकर या मुलांसह 2016मध्ये विप्रोकडे सादर केलेल्या जलव्यवस्थापन या प्रकल्पाला अर्थियन हा एक लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना पुणे ते बेंगलोर असा विमान प्रवास घडला.मुलांसोबतच्या पहिल्या-वहिल्या विमानप्रवासावर आधारित पुस्तक त्यांनी लिहिले. या प्रवासातील गमती-जमती पुस्तकात वाचायला मिळतात. एका वाडीतील जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झालेला हा प्रवास भारताच्या सिलिकॉन व्हॅलीपर्यंत पोहोचताना त्याचे वर्णन रोमांच उत्कंठा आणि उत्साहाने भरलेलं आहे. लेखकाने या प्रवासाचे वर्णन आपल्या अनोख्या शैलीत मांडले आहे.
विमानप्रवासाची गोष्ट हे माझे मराठी पुस्तक इंग्रजीत अनुवादित होऊन देशभरातील वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. याचा आनंद आहे. मुलांच्या लोकल टू ग्लोबल शिकण्याचा प्रवास पुस्तकात वाचायला मिळतो.
भाऊसाहेब कासार, प्रयोगशील शिक्षक लेखक