नेवासाफाटा (पवन गरुड) – सध्या सर्व बियरबार व परमिटरूम बंद असतांना शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी दारू विक्री कशी सुरू आहे, हा प्रश्न उपस्थित होत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील एकवीस दिवसांपासून नेवासा शहरासह तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदीमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. मात्र अवैध दारू विक्रीला जोर आला असून चढ्या भावाने मोठ्या प्रमाणावर अवैध दारू व विक्री होत आहे. देशी दारूच्या बाटलीसाठी दोनशेहून अधिक रक्कम तळीरामांना मोजावी लागत असल्याने तळीरामांचे हाल होत आहे.
लॉकडाऊन काळात बंदोबस्त सुरू असतानाही नेवासा पोलिसांनी कार्यक्षेत्रात अकरा ठिकाणी छापे मारून अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केले. मात्र याउलट राज्य उत्पादन शुल्क विभागाची पाहिजे तशी कारवाई होताना दिसत नाही. एकवीस दिवसांत तालुक्यात अवघ्या चार वारस केस झाल्याचे अधिकारी सांगत आहे. यात देशी व गावठी दारूचे प्रमाण सर्वाधिक आहे. छुप्या मार्गाने गावागावात ही दारू पोहचविली जात आहे. मात्र वाहतूक नेमकी कुठल्या वाहनातून होते याचा तपास मात्र लागणे अवघड आहे. राज्य उत्पादन शुल्कचा एकही अधिकारी तालुक्यात कारवाई करताना दिसत नाही.
त्यामुळे अवैध दारू विक्री करणारे तेजीत दारू विक्री करताना दिसत आहे. पोलीस यंत्रणेचे कर्मचारी करोनाशी लढा देण्यात व्यस्त असल्याचा फायदा हे दारूविक्रेते घेत आहेत. तंबाखू आणि सिगारेटचे दर देखील गगनाला भिडले आहेत.13 रुपयाला मिळणारी तंबाखूची पुडी आता 20 रुपयाला विकली जात आहे.