नगर -केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानांतर्गत अत्यंत खर्चिक आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या शस्त्रक्रिया अगदी मोफत केल्या जात आहेत. सरकारच्या या अभियानाच्या माध्यमातून रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ पैशांअभावी शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही अशा लाभार्थींना फायदा मिळाला आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत जवळपास 6 लाख 97 हजार 199 मुलांची आरोग्य तपासणी केली आहे. तसेच 47 बालकांच्या कानाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शस्त्रक्रियेमुळे या 47 बालकांनी प्रथमच आवाज ऐकला आहे.
या अभियानात मार्च 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकांनी 130 बालकांची हृदय शस्त्रक्रिया पुणे व मुंबई येथील रुग्णालयात मोफत करण्यात आल्या. यासाठी साधारण 4 ते 7 लाख रुपये खर्च येतो. 47 बालकांच्या कॉकलिअर इम्लांट शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठीही जवळपास 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो. या शस्त्रक्रिया सुद्धा मोफत करण्यात आल्या. या व्यतिरिक्त टंगटाय आजाराच्या 147, क्लेप्टपॉलेट आजाराच्या 26, ऑर्थोपेडिक आजाराच्या 6, तिरळेपणा व जन्मजात अंधत्वाच्या 92, कानाच्या 55, हर्निया हायड्रोसिल सारख्या 58 तसेच इतर आजारांच्या 384 शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकांमार्फत अंगणवाडी आणि शाळांतील मुलांची तपासणी करण्यात येते. त्यामुळे जन्मतः हृदयरोग व बहिरेपणा असणाऱ्या बालकांचे निदान लवकर होते. तसेच अत्यंत खर्चिक शस्त्रक्रिया राज्यातील विविध शहरांतील प्रसिद्ध खासगी रुग्णालयात सरकारमार्फत मोफत करण्यात येतात. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील पालकांना या योजनांचा फायदा होत आहे, अशी माहिती नगर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
=============