यवत -देऊळगाव गाडा (ता.दौंड) येथे चोरट्यांनी दोन घरात प्रवेश करून मौल्यवान सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 5 लाख 70 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 27) पहाटे चारच्या सुमारास घडली.
देऊळगाव गाडा येथील शेतकरी कुंडलिक भुजंग शितोळे तसेच सुखदेव बारवकर यांच्या घरातही चोरी झाली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुंडलिक शितोळे रात्री काम करून आल्यावर घराचे दार उघडे ठेवून झोपले होते, तसेच घरातील लोखंडी कपाटाचे लोकरीचे चावी ही कपाटालाच लावलेली होती.
रात्री 1. 30 ते पहाटे 4 वाजण्याच्या आसपास चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाला लावलेली चावी काढून कपाटातील 4 लाख किमतिचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. तसेच सुखदेव बारवकर यांच्याही घरातील कपाटातले सोन्याच्या दागिन्यांची व रोख रक्कम 20 हजार असे एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
यावर कुंडलिक शितोळे यांनी पाटस पोलीस चौकीत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस हवालदार संदीप कदम, पोलीस नाईक घन:शाम चव्हाण आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली.