पिंपरी -बुलेटचे मूळ सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावण्याचे प्रकार पुन्हा एकदा शहरात सुरू झाले आहेत. अशा बुलेटस्वारांवर कारवाईचे हत्यार पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांकडून उपसण्यात आले आहेत.
बुलेटचा मूळ सायलेन्सर बदलून त्याजागी मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावण्याचे फॅड शहरात आले आहेत. त्यातही काहीजण फटाक्यासारखा मोठा आवाज करणारे सायलेन्सर लावतात. यामुळे रस्त्यावरून जाणारे इतर वाहन चालक अचानक आलेल्या आवाजामुळे घाबरतात. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना होतो.
तर काहीजण मोठ्या आवाजाचे हॉर्नदेखील लावतात. यामुळे ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. सप्टेंबर 2020 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 18 ऑक्टोबर 2020 मध्ये बुलेटचे सायलेन्सर बदलणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले.
मूळ सायलेन्सर बदलणाऱ्यांवर अडीच हजार चालकांवर जानेवारी 2021 पर्यंत कारवाई केली. त्यांच्याकडून 25 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र कालांतराने बुलेटवरील ही कारवाई थंडवली. त्यामुळे अनेकजणांनी पुन्हा मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावले.
बुधवार (दि. 22) पासून वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्तांनी पुन्हा एकदा बुलेटचे सायलेन्सर बदलणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांच्या बारा वाहतूक शाखेने कारवाईला सुरवात केली. गेल्यावर्षी वाहतूक पोलिसांकडून अशा बुलेटस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जात होती.
मात्र यावेळी दंडात्मक कारवाईसह मोठा आवाज करणारा सायलेन्सरही जागेवरच काढून घेतला जात आहे. ही कारवाई पुढील चार दिवस सुरू राहणार आहे. तसेच यापुढील काळातही बुलेटचे सायलेन्सर बदलणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.