पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 24 मधील लक्ष्मणनगर येथील कांतीलाल थिंवसरा पाटील मनपा दवाखाना रस्त्यावर न्यूट्रीजन फार्मा व इंडीड्रॅग या एजन्सींनी मुदत संपलेली औषधे उघड्यावर टाकल्यामुळे दंड ठोठाविण्यात आला आहे. नागरिक व विक्रेत्यांनी मुदत संपलेली औषधे उघड्यावर टाकू नयेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर औषधविक्री होते. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात मोठ्या प्रमाणावर मेडिकल, हॉस्पिटल तसेच होलसेल विक्रेते आहेत. परंतु बहुतांश विक्रेते, नागरिक मुदत संपलेली औषधे कचराकुंडी, नदी किनारा अथवा अडचणीचे ठिकाण पाहून उघड्यावर टाकून देत आहेत. हे धोकादायक ठरु शकते. यामुळे औषधविक्री करणारे विक्रेते, होलसेल व्यावसायिक तसेच नागरिकांनी मुदत संपलेली औषधे इतरत्र न टाकता त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
न्यूट्रीजन फार्मा व इंडीड्रॅग या एजन्सींनी मुदत संपलेले औषध बाटल्या तसेच टेबलेट्स उघड्यावर टाकल्याबाबत त्या एजन्सीला 25000 हजार रुपयांचा दंड केला आहे. तसेच औषध विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या.
ही कारवाई सहायक आयुक्त तथा ग क्षेत्रीय अधिकारी रविकिरण घोडके, प्रभारी सहायक आरोग्य अधिकारी राजू बेद, मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 24 चे आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल, शुभम कुपटकर व कर्मचारी अरुण राऊत, प्रशांत पवार व राजू जगताप यांच्या मार्फत करण्यात आली.