तर बेड मिळणे मुश्कील; आयुक्तांनी व्यक्त केली भीती
पिंपरी – शहरातील करोनाची परिस्थिती सध्या अतिशय गंभीर बनली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर काही दिवसांनी रुग्णांना बेड मिळणे मुश्कील होईल. त्यामुळे नागिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. गृह विलगीकरणातील नागरिक उठून थेट बाहेर येत आहेत. तिथे ते कोणतीही काळजी घेत नाहीत. काहीजण करोनाला खूप हलके घेत आहेत. असे न करता नागरिकांनी स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
आयुक्त राजेश पाटील यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शहरातील नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्व गोष्टींचे आकलन करूनच निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करावे. करोना संक्रमणाची परिस्थिती सध्या गंभीर आहे. विलगीकरणात असलेले रुग्ण नियम पाळत नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. विलगीकरणात असलेले काही रुग्ण बाहेर येऊन फिरत आहेत. त्यांनी तसे न करता नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
शहरातील तरुणांचा करोनाबाबत दृष्टीकोन खूप वेगळा आहे. मला काही होत नाही अशी त्यांची भूमिका आहे. मात्र तुम्हाला करोनाचा जास्त त्रास होत नसला तरी तुम्ही करोनाचे वाहक आहात. त्यामुळे तुमचे कुटुंब बाधित होऊन त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले.