सविंदणे-शिरुर तालुक्यातील कवठे येमाई, सविंदणे शिवेलगत इचकेवाडी परिसरातील शेत शिवारात बिबट्याचा दिवसा मुक्त संचार पाहून शेतकरी चिंतेत आहे. शेतात एकाच ठिकाणी दिवसातून दोन- दोन वेळा बिबट्याचे दर्शन घडत असल्याने शेतातील कामे करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य या परिसरात आहे. अनेक पाळीव प्राणी, कुत्री त्याने फस्त केली आहेत. रविवारी (दि. 8) दिनेश पळसकर हे पत्नी आणि मुलासमवेत शेतात काम करत असताना दिवसातून दोन वेळा त्यांना बिबट्या निदर्शनास आला.
शेतातील कामे अर्धवट सोडून घाबरलेल्या अवस्थेत जीव मुठीत धरून ते घराकडे निघून गेले. मागील काही दिवसांत बिबट्याने भानुदास पोकळे यांच्या पाळीव कालवडींवर रात्रीचा हल्ला करुन एकीचा फडशा पाडला होता. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य साधना पोकळे व निलेश पळसकर यांनी केली आहे.