उंचखडक येथील आखाड्यात झाल्या 120 कुस्त्या
बेल्हे -राजुरी उंचखडक (ता. जुन्नर) येथे श्री भैरवनाथ यात्रोत्सवानिमीत्ताने आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांमध्ये प्रथम क्रमांकाची 51 हजार रूपयांची कुस्ती तसेच भैरवनाथ केसरी किताब पै. विक्रम घोरपडे याने पटकावला. तर दुसऱ्या क्रमांकाची 20 हजार रुपयांची कुस्ती सुरेश पालवे याने जिंकली.
यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, पंचायत समितीचे माजी सभापती दिपक औटी, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक कुंडलिक हाडवळे, सरपंच एम. डी. घंगाळे, दत्तात्रय कणसे, माऊली शेळके, सिनेअभिनेते अविनाश औटी, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, एकनाथ शिंदे, बाळासाहेब हाडवळे, मंडळाचे अध्यक्ष संजय हाडवळे, वल्लभ शेळके, भाऊसाहेब कणसे, सयाजी हाडवळे, बी. टी. डुंबरे, सतीश औटी, सुदाम औटी आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार बेनके म्हणाले, उंचखडक (ता. जुन्नर) येथे अद्ययावत असे कुस्तीचे स्टेडीयम उभारणार आहोत. राजुरी ते उंचखडक या रस्त्याचे काम लवकर मार्गी लावणार आहे. तसेच देवस्थानच्या मंदीर दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. माजी आमदार सोनवणे यांनी सांगितले की, राजुरी ते उंचखडक मार्गाने सुरकुलवाडी रस्त्याचे काम होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
यावेळी चांदीचे बक्षिसांसाठी झालेल्या कुस्ती स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकासाठी अकरा तोळे चांदीचे बक्षिस दत्ता जगदाळे यांना देण्यात आले. तर द्वितीय क्रमांकासाठी दहा तोळे चांदीचे बक्षीस काळु काकडे यांना देण्यात आले तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी नऊ तोळे चांदीचे बक्षीस सतीष साळुंखे यांना देण्यात आले व चौथ्या क्रमांकासाठी खेळलेल्या कुस्तीमध्ये 8 तोळे चांदीचे बक्षीस लक्ष्मण कोळी यांनी मारले.
यावेळी जवळपास 120 लहान-मोठ्या कुस्त्या झाल्या. तसेच 100 रूपयांपासून 51हजार रुपयांपर्यंत रोख इनामी बक्षीसे पहिलवानांना देण्यात आली. तर या ठिकाणी विशेष कुस्तीपट्टू म्हणून मुलींच्या कुस्त्या यावेळी झाल्या. कुस्ती निवेदन बाळासाहेब कुऱ्हाडे पंच म्हणून संजय गुंजाळ, पांडुरंग गाडेकर दत्ता गावडे, संतोष शिंदे यांनी काम पाहिले.