पुणे( सिंहगड रोड) : ज्या सोसायटीत करोनाबाधित दोन रुग्ण आढळले होते. तेथे मंगळवारी दिवसभर शांतता होती. पहाटेपासूनच पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी सोसायटीची तपासणी सुरू केली होती.
पुण्यातील सिंहगड रोडवर करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे समजतात शहरात एकच खळबळ उडाली.ज्या सोसायटीमध्ये हे रुग्ण आढळले, तेथील प्रत्येक रहिवाशाची स्वतंत्र तपासणी करण्यात आली. त्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने सोसायटीमध्येच छोटेखानी रुग्णालय उघडले होते. या सोसायटीतच दोन डॉक्टर वास्तव्यास आहेत. त्यांचीदेखील मदत घेण्यात आली.
परिसरातील नागरिकांना काही समजण्याच्या आताच पहाटेच्या सुमारास या सगळ्या तपासण्या करण्यात आल्या, पण सकाळी सोशल मीडियासह इतर माध्यमांत बातम्या प्रसारित होण्यास सुरुवात झाल्यावर त्याची तीव्रता वाढत गेली.
नागरिकही रस्त्याने जाता-येता सोसायटी कडे पाहत होते. दुपारनंतर मात्र सोसायटीमध्ये कुठलाही पोलीस बंदोबस्त नव्हता. फक्त रहिवाशांना तपासणी झाल्याशिवाय सोसायटीमधून बाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला होता.