टाकवे, कान्हे रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच
टाकवे बुद्रुक – कान्हे औद्योगिक वसाहत असलेल्या आंदर मावळात जाणाऱ्या प्राथमिक जिल्हा मार्गावर साईडपट्टी खचल्याने कान्हे गावाच्या हद्दीतील जे. एस. डब्ल्यू. स्टॉक यार्डसमोर (एम. एच. 48 जे 0429) क्रमांक असलेला कंटेनर उलटून अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
काही महिन्यापूर्वी महिंद्रा कंपनी ते टाकवे येथील केएसपीजी या कंपनी दरम्यान एका खासगी कंपनीने इंटरनेट केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोदकाम केले होते; परंतु या काम करणाऱ्या कंत्राटदराने हलगर्जीपणा करीत खोदलेल्या ठिकाणी साईडपट्टी योग्य रीतीने न बुजवल्याने हा अपघात घडल्याचे निदर्शनास येत आहे. पावसाळ्यात ही या प्रकारचे अनेक छोटे-मोठे अपघात या रस्त्यावर घडले आहेत.
या प्रकरणी सेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाला खोदकाम केलेल्या कंत्राटदाराकडून साईडपट्टी भरून घ्यावी, असे निवेदन त्यावेळी देण्यात आले होते; परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कामाला हालचाल करण्यात आलेली नरही. अपघात थांबवावे याकरिता नव्याने साईडपट्या भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू करावे, अशी विनंती सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप मालपोटे, किरण भागरे, अनिल जाधव, चंद्रकांत असवले, तानाजी मोरे यांनी केली आहे.
यासंदर्भात आम्ही सातत्याने निवेदन देऊन याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले अद्याप काम सुरू झालेले नाही. भविष्यात पुढे मोठा अपघात घडू नये याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग या बाबतीत अधिक लक्ष देऊन काम त्वरित सुरू करणे गरजेचे आहे.
– संदीप मालपोटे, अध्यक्ष, सेवा फाउंडेशन.
टाकवे कान्हे रस्ता दुरुस्तीचे काम सुरुच आहे. पावसाळ्यामुळे साईड पट्याचे काम भरण्यासाठी व्यत्यय येत होता. पुढील काही दिवसांत साईडपट्ट्या भरण्याचे काम तातडीने हाती घेतले जाईल.
– बी. जे. पाटील, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.