पिंपरी – निवडणुका आल्या की मतदारांसोबत जवळीक वाढवायची हे राजकारण्याचे ओपन सिक्रेट आहे. परंतु आता नागरिकही आपली कामे काढून घेण्यासाठी निवडणुकांची वाट पाहत असतात. एवढेच नव्हे तर मोठ्या सोसायट्यांमधील नागरिकांच्या मागण्या पाहून आता राजकीय मंडळींनी घाम फुटू लागला आहे. सत्काराच्या निमित्ताने बोलवून सोसायट्याच्या अतिशय खर्चिक कामांची यादी नगरसेवक किंवा इच्छुकाच्या हाती देण्याचे चलन सुरू झाले आहे.
महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने नगरसेवक आणि इच्छुकांनी जनसंपर्क सुरू केला आहे. शहरातील काही सोसायट्यांमधील पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्यांना सोसायट्यांमध्ये सत्कारासाठी बोलवितात. त्यानंतर आम्ही तुमच्या सोबतच आहोत, असे सांगत सोसायट्यांमधील खर्चिक कामांची यादी पुढे करतात. या कामांचा खर्च पाहून इच्छुक आणि नगरसेवकांनी आता बड्या सोसायट्यांमधील सत्काराचा धसकाच घेतला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी 1 फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहीर झाली. आपल्या प्रभागात कोणकोणता भाग येतो, याची माहिती मिळाल्यावर इच्छुक उमेदवार आणि नगरसेवक यांनी जनसंपर्कास सुरुवात केली आहे. याच संधीची वाट पाहत असलेल्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या सोसायटीमधील मतदारांची यादी आणि सोसायटीमध्ये करावयाची कामे याची यादी तयार केली. सोसायटीचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार आणि नगरसेवक यांना आपल्या सोसायटीमध्ये बोलावून त्यांचा सत्कार केला जातो.
तसेच आमच्या सर्व सोसायटीतील सदस्य तुमच्याच सोबत असल्याची ग्वाही देऊन तुम्हीच निवडून येणार असल्याची खात्रीही संबंधिताला देण्यात येते. त्यानंतर सोसायटीत सीसीटिव्ही बसविणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, रंगरंगोटी करणे, सीमा भिंत बांधून देणे किंवा आणखी पाण्याची टाकी उभारणे, गार्डनची दुरूस्ती करून खेळणी देणे, एवढेच नव्हे तर जनरेटर, लिफ्ट, कम्पोस्टिंग युनिट, वॉटर प्रूफिंग अशा खर्चिक कामांची यादी इच्छुक किंवा नगरसेवकासमोर ठेवली जाते. या कामांचा खर्च पाहून अक्षरशः घाम फुटतो. काही नगरसेवक मात्र अशा कामांना थेट नकार देत, महापालिकेशी संबंधित काम असल्यास सांगा, ते मी जरूर करून देईल, असे ठामपणे सांगतात.