पुणे –महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यावेळी मुख्याध्यापकांची रिक्त पदे लवकरच भरणार असल्याचे आश्वासन त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली.
आपसी जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करणे, पदवीधर शिक्षकांची पदोन्नती करणे, जिल्हा बदलीने जिल्हा परिषदेमध्ये रुजू झाल्याची तारीख हीच शाळेतील तारीख धरणे, आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेचे नियोजन अंतिम टप्प्यात असा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. याबाबतचे काम लवकरच पूर्ण करून घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. यावेळी राज्य कार्याध्यक्ष चंदक्रांत सलवदे, राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे, राज्य उपाध्यक्ष संतोष ससाने, पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद चव्हाण, मिलिंद थोरात, राहूल गायकवाड, कन्हैय्या गौड, कैलास थोरात उपस्थित होते.