पुणे –आरोग्य विभागातील गट (ड) संवर्गातील पदाच्या पेपरफुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी 20 जणांविरोधात 3 हजार 816 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. दोषारोपपत्र दाखल केलेल्या संशियित आरोपींमध्ये नेव्हल डॉकयार्डमधील खलाशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, भूम येथील ग्रामीण रुग्णायातील क्लार्क, आंबेजोगाई मेंटल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक आदींचा समावेश आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या साधनांमधून सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने आरोपींविरोधात दोषारोपपत्र न्यायालयापुढे सादर करण्यात आले आहे.
पोलिसांनी आजवर केलेल्या तपासामध्ये प्रशपत्रिकेतील शंभर पैकी तब्बल 92 प्रश्न फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विजय प्रल्हाद मुऱ्हाडे (वय 29), अनिल दगडू गायकवाड (वय 31), सुरेश रमेश जगताप (वय 28), बबन बाजीराब मुंढे (वय 48), संदीप शामराव भुतेकर (वय 38), प्रकाश दिगंबर मिसाळ (वय 40), उध्दव प्रल्हाद नागरगोजे (वय 26), प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय 50), डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय 36), शाम महादू मस्के (वय 38), राजेंद्र पांडूरंग सानप (वय 51), महेश सत्यवान बोटले (वय 53), नामदेव विक्रम करांडे (वय 33), उमेश वसंत मोहिते (वय 24), अजय नंदू चव्हाण (वय 32), कृष्णा शिवाजी जाधव (वय 33), अंकीत संतोष चनखोरे (वय 23), संजय शाहूराव सनाप (वय 40), आनंद भारत डोंगरे (वय 27), अर्जुन भरत बमनावत उर्फ राजपुत (वय 30) अशी त्यांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, आर्थिक व सायबर गुन्हे पोलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त विजय पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके व पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील यांनी हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.