सर्वसाधारणपणे माता-पिता विभक्त झाल्यावर मुलांच्या मनावर विपरित परिणाम होतो. या धक्क्यातून मुलांना सावरायला बराच वेळ लागू शकतो. अर्जुन कपूरनेही काही दिवसांपूर्वी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. मात्र कमल हासन आणि सारिका विभक्त झाल्यावर त्यांची कन्या श्रुती हासनला दिलासा मिळाला आहे.
जर दोघेजण एकमेकांबरोबर राहू शकत नसतील, तर त्यांनी वेगळे झालेलेच चांगले, असे परखड मत श्रुतीने व्यक्त केले. कमल हासन आणि सारिका यांचा विवाह 1988 मध्ये झाला होता आणि 16 वर्षांच्या संसारानंतर 2004 मध्ये ते विभक्त झाले होते.
वडील कमल हासन आपल्यासाठी अधिक जवळचे आहेत. तर आई आपल्या जीवनाचाच एक भाग आहे. हे दोघे मिळून खूप चांगले पालक आहेत. मात्र ते दोघेही एकमेकांबरोबर कधीही छान रिलेशनशीपमध्ये नव्हते. त्यामुळे ते जेंव्हा वेगळे झाले, तेंव्हा आपल्याला दिलासा मिळाल्याचे तिने सांगितले.
श्रुती सध्या ऍक्टिंगपेक्षा पोस्ट प्रॉडक्शनवर लक्ष केंद्रित करते आहे. तिने आपल्या घराचा एक भाग डबिंग स्टुडिओ केला आहे. या स्टुडिओमध्ये ती डबिंग करत असते. सध्याच्या काळात घराबाहेर न पडण्यासाठी तिने हा उद्योग सुरू केला आहे.