कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मुळापासून हलवले…

मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कबुली

नवी दिल्ली :  कोरोनाची दुसरी लाट आपला संयम आणि सहनशक्‍तीची परीक्षा पाहात आहे. आपल्यातील अनेकांचे निकटवर्तीय आपल्याला कायमचे सोडून गेले आहेत. आपण पहिल्या लाटेचा खूप धैर्याने मुकाबला केला. मात्र, दुसऱ्या लाटेने आपल्याला मुळापासून हलवून सोडले आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्‍त केले.

या लाटेशी मुकाबला करण्यासाठी मी अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यात औषध क्षेत्र, ऑक्‍सिजन उत्पादन अशा अनेक क्षेत्राचा समावेश होता. आमचे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्‍टर्स आज करोनाविरुद्धचे महत्त्वाचे युद्ध लढत आहेत. गेल्या वर्षी त्यांना या स्वरूपाच्या अनेक अनुभवांना सामोरे जावे लागले. करोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य देण्यात येईल, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान म्हणाले की, भारत सरकारकडून जो विनामूल्य लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे, तो पुढेही चालू राहील, माझा राज्यांना आग्रह आहे की, त्यांनी भारत सरकारच्या या विनामूल्य लसीकरण मोहिमेचा फायदा आपल्या राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवावा.

डॉ. जोशी उवाच…
मन की बातमध्ये निमंत्रित डॉ. शशांक जोशी म्हणाले की, करोनाची दुसरी लाट खूप वेगाने आली आहे आणि पहिल्या लाटेपेक्षा विषाणूच्या संसर्गाची गती अधिक आहे. परंतु, त्याच्या संसर्गापेक्षाही जास्त गतीने लोक बरे होत आहेत आणि मृत्युदरही खूप कमी आहे, ही याच्याबाबतीत दिलासादायक गोष्ट आहे. या लाटेबाबत दोन-तीन फरक आहेत. पहिल्यांदा करोनाचा संसर्ग युवक आणि मुलांमध्येही थोडा दिसून येत आहे. त्याची जी श्वास लागणं, कोरडा खोकला येणे, ताप येणे ही पहिल्या लाटेसारखी लक्षणे तर आहेतच, परंतु त्याबरोबर वासाची जाणीव नष्ट होणे, चव न लागणे हीही आहेत आणि लोक थोडे घाबरले आहेत. खरे तर लोकांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही. 80 ते 90 टक्के लोकांमध्ये याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

डॉ. जोशी म्हणाले की, रेमडेसिविरच्या वापरामुळे रुग्णाचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी दोन ते तीन दिवसांनी कमी होतो हे औषध पहिल्या नऊ ते दहा दिवसांत दिलं तरच काम करते आणि पाचच दिवस ते देता येते. परंतु हे औषध थोड्या प्रमाणातच काम करतं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.