जेनेव्हा – करोनाची दुसरी लाट आली तर ते अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा दिला आहे. संघटनेचे सहसंचालक जनरल रनीरी गुएरा यांनी यासंदर्भात शंभर वर्षांपूर्वी आलेल्या स्पॅनीश फ्लू या महामारीचे उदाहरण दिले. त्यावेळी सप्टेंबरनंतरच्या काळात आजाराचा पुन्हा प्रकोप झाला होता, कारण तेव्हा तापमान थंड होते याकडे गुएरा यांनी लक्ष वेधले आहे.
इटलीच्या एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गुएरा म्हणाले की, स्पॅनीश फ्लूची लाट दुसऱ्यांदा जेव्हा आली तेव्हा त्यात कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला. कोविडचीही लक्षणे तशीच दिसत आहेत. वातावरणात उष्णता होती, तेव्हा रूग्णांची संख्या कमी झाली. मात्र गारठा निर्माण झाल्यावर रूग्णसंख्या वाढू लागली होती. यापूर्वी युरोपीयन सेंट्रल बॅंकेच्या प्रमुख क्रिस्टिन लॅगार्ड यांनीही शुक्रवारी बोलताना सावधानतेचा इशारा दिला आहे.
आपण जर स्पॅनीश फ्लूच्या अनुभवातून शिकून शहाणे झालो नाही, तर कोविडच्या बाबतीतही आपल्याला मोठे मूल्य चुकवावे लागेल असे त्यांनी नमूद केले आहे. यापूर्वीही अनेक तज्ञांनी कोविडच्या संदर्भात भाष्य केले आहे. अधिक तापमानात कोविडचा प्रसार कमी होतो. मात्र तापमान कमी असले तर प्रादुर्भाव वेगात होण्यास सुरूवात होते. मात्र अनेक तज्ञांनी याबाबत असहमतीही दर्शवली आहे. असे सिध्द करणारी बाब अद्याप समोर आली नसल्याचा त्यांचा दावा आहे.