स्वच्छ, सुंदर, उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल
पुसेगाव – जिल्हा परिषदेच्या स्वच्छ, सुंदर, उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण प्राथमिक शाळा स्पर्धेत विसापूर (ता. खटाव) शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचेमाजी पदाधिकारी प्रदीप विधाते, मानसिंगराव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्या हस्ते शाळेला गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेमार्फत ही स्पर्धा प्राथमिक व उच्चप्राथमिक अशा दोन गटांत दरवर्षी जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी घेतली जाते.
जिल्हास्तरावरून समिती नेमून तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त शाळांचे मूल्यांकन केले जाते. यापूर्वी 2018 मध्ये शाळेला जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. यावर्षी शाळेने विविध स्तरावर सर्वोत्तम कामगिरी केली. शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी व सर्वाधिक निकाल असलेली एकमेव शाळा ठरली. सैनिक स्कूलसाठीही दोन विद्यार्थी पात्र ठरले. गत दोन वर्षात अडीच लाख, तर आतापर्यंत 15 लाख अशा लोकसहभागातून शाळेचा कायापालट झाला आहे.
येथील पालक, ग्रामस्थ व शिक्षक एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असतात. त्यामुळेच आज शाळा ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरली आहे. विसापूर नाव घेतलं की, “तुमची शाळा सुंदर आहे.’ असे बोल समोरून येतात. अर्थातच यामागे शिक्षकांचे योगदान अनमोल आहे. शाळेचा परिसर पाहताक्षणी प्रसन्न वाटते. बोलक्या भिंती, हिरवाईने नटलेला परिसर, संगणक कक्ष, आधुनिक डीजिटल क्लासरूम, प्रयोगशाळा व वाचनालय, स्मार्ट टीव्हीसह स्मार्ट क्लास, परसबाग, आर. ओ. सुविधा, प्रशस्त क्रीडांगण, बोलकी संरक्षक भिंत, सी. सी. कॅमेरा यासह सर्व भौतिक सुविधांनी शाळा परिपूर्ण आहे.
शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर धायगुडे, सहकारी शिक्षिका वैशाली नांदे, स्मिता शेळके, शुभांगी चव्हाण, वैशाली जाधव, रेश्मा बोडरे यांनी करोना संकटातही सुयोग्य नियोजनातून विद्यार्थी व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी परिश्रम घेतले. शाळेमध्ये वर्षभर अनेक उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात. स्पर्धा परीक्षेत शाळेने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे परिसरातील गावातून अनेक विद्यार्थ्यांनी येथील शाळेत प्रवेश घेतला आहे.
शाळेची पटसंख्या 183 आहे. दर्जेदार ‘अंकुर ‘ वार्षिक स्नेहसंमेलन येथील वैशिष्ट्य आहे. शाळेच्या यशाबद्दल जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सागर साळुंखे, माजी उपसभापती संतोष साळुंखे, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, विस्ताराधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख प्रमोद जगदाळे, सरपंच निलम जगताप, उपसरपंच कैलास साळुंखे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी साळुंखे, उपाध्यक्ष अनुजा ढोले तसेच ग्रामस्थ, आजी- माजी सैनिक संघटना, सेवानिवृत्तांची सेवाभावी संस्था, आजी माजी पदाधिकारी, पालक यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.