- नियम पाळणे बंधनकारक – खासगी शाळा टप्प्याटप्प्याने होणार सुरू
- सगळ्या शाळा एकाच दिवशी सुरू होणे अशक्य
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील नववी ते बारावीच्या शाळा सोमवारपासून ( दि. ४) सुरू करण्यात येणार आहेत. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पूर्तता ज्या शाळा करतील त्याच शाळा सुरू होणार आहेत. शाळेची रोज स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थ्यांना हात धुण्याची सोय करणे, थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण उपलब्ध करून देणे, शाळा वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण करणे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची करोना तपासणी करणे, शारीरिक अंतराचे पालन करणे आदी नियमांची पर्तता शाळांना करायची आहे. या नियमांचे पालन करणाऱ्या शाळा सुरू होणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 658 शाळा आहेत. त्यापैकी नववी ते बारावीच्या खासगी शाळा 258 व महापालिकेच्या माध्यमिक शाळा 18 अशा एकूण 276 शाळा सुरू करता येणार आहेत. तर, नववी ते बारावीचे पालिका शाळेतील विद्यार्थी 4490 असून, खासगी शाळांमधील विद्यार्थी 88352 इतके आहेत. नववी ते बारावीच्या वर्गासाठी खासगी शाळांमध्ये 4671 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. तर, महापालिका शाळांमध्ये 229 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांना शाळेत येण्यापूर्वी आपली करोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. मात्र ही चाचणी करून दीड महिना उलटून गेला आहे. त्यामुळे पुन्हा शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी संक्रमित तर नाही ना यासाठी तपासणी आवश्यक आहे.
आजपासून सर्व नियमांची पूर्तता करणाऱ्याच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचे तापमान रोज मोजणे गरजेचे आहे. तापमान जास्त असल्यास शाळेच्या आत येण्यास परवानगी मिळणार नाही. शाळा सुरू झाल्यावर बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला शाळेत येता येणार नाही.
नियमांचे पालन होत आहे का पाहणे आवश्यक
शाळा सुरू करण्यासाठी राज्य शासनाने शाळा प्रशासनाला काही नियम घालून दिले आहेत. त्या नियमांची पूर्तता करणे शाळा प्रशासनाला बंधनकारक आहे. शाळांकडे त्यांची व्यवस्था काय आहे? शाळांकडे आवश्यक कर्मचारी वर्ग आहे का? विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे नियोजन कसे होणार? या सर्व बाबी तपासणे गरजेचे आहे.
पालिकेच्या 18 शाळा सुरू होणार
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या 18 शाळा आहेत. या शाळांमध्ये सर्व तयारी झाली आहे. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच शाळांचे सॅनिटायजेशन पूर्ण झाले आहे. शाळेतील 75 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा सुरू करण्यासाठी संमती पत्रके दिली आहेत. त्यामुळे पालिकेच्या माध्यमिक विभागाच्या 18 शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
ज्या शाळा परिशिष्ठ “अ’ आणि “ब’ च्या नियमांची पूर्तता करतील, त्याच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. ज्या शाळांमध्ये सोयी-सुविधा अपूर्ण असतील त्या शाळा सुरू होणार नाहीत. त्यांना वेळ वाढवून देण्यात येईल. त्या शाळांनी सर्व नियमांची पूर्तता केल्यावरच सुरू करण्यात येतील. त्यामुळे एकाच दिवशी सर्व शाळा सुरू होणार नाहीत. सामाजिक अंतराचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतरासाठी चौकट आखणे, मास्कचा नियमित वापर आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. ज्या शाळा या नियमांची पूर्तता करतील त्याचा शाळा सुरू केल्या जातील. काही शाळा उशीरा सुरू होतील.
– पराग मुंढे, सहायक प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग