अन्नदात्यांचे हाल पाहून माझे मन अस्वस्थ; सरकारने त्वरित काळे कायदे मागे घ्यावेत – सोनिया गांधींचे पत्र

नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्दयावरून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच आंदोलन पाहू न शकणारे गर्विष्ठ सरकार सत्तेवर आले आहे, अन्नदात्यांचे हाल पाहून माझे मन अस्वस्थ आहे, असे म्हणून सरकारने त्वरित वादग्रस्त कृषी कायदे बिनशर्त मागे घ्यावेत, अशी मागणीही सोनिया गांधींनी केली आहे.

लोकशाहीमध्ये नागरिकांच्या भावना ओळखू न शकणारे सरकार आणि नेत्यांना दीर्घकाळ सत्तेवर राहता येऊ शकत नाही. आंदोलन करणारे शेतकरी आता सरकारच्या दबावापुढे झुकणार नाहीत, हे आता स्पष्ट आहे. अजूनही वेळ गेलेली नाही.

मोदी सरकारने सत्तेचा अहंकार सोडून द्यावा आणि थंडी, पावसामध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन समाप्त करण्यासाठी ताबडतोब काळे कायदे बिनशर्त मागे घ्यावेत. हाच राजधर्म आहे. आंदोलन करताना आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या शेतकऱ्यांना हीच योग्य आदरांजली असेल, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

जनतेच्या हिताचे रक्षण करणे हाच लोकशाहीचा अर्थ आहे, हे मोदी सरकारने लक्षात ठेवले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. गेल्या 39 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर थंडी आणि पावसामध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे देशातील नागरिकांबरोबर आपणही व्यथित झालो आहोत. सरकारच्या असहिष्णूतेमुळे आतापर्यंत 50 शेतकऱ्यांना त्यांचा जीव गमावावा लागला आहे.

काही जनंनी सरकारच्या निष्काळजीपणामुळे आत्मह्त्येसरखे पाऊलाही उचलले आहे. मात्र हृदयशून्य्‌ मोदी सरकार, पंतप्रधान अथवा एकाही मंत्र्याने सहानुभूतीचा एकही शब्द उच्चारलेला नाही. या वेदना सहन करण्याची क्षमता त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, हीच परमेश्‍वराकडे प्रार्थना आहे, असेही सोनिया गंधी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.