लोणावळा – शासकीय निर्देशांचे पालन करीत 15 डिसेंबरपासून लोणावळा शहरातील इयत्ता 9 ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय 5 डिसेंबर रोजी घेण्यात आला. शाळा सुरू करण्यासंदर्भात पालकांची मागणी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
लोणावळा नगरपरिषदेच्या कार्यालयात लोणावळा नगरपरिषद आणि शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापक यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, मुख्याधिकारी रवी पवार, शिक्षण समिती सभापती आरोही तळेगावकर, प्रशासन शिक्षण अधिकारी रोडगे, शाळा समिती सभापती देविदास कडू, ब्रिनदा गणात्रा, नगरसेवक श्रीधर पुजारी, संजय घोणे, नितीन अगरवाल, विशाल पाडाळे आदी उपस्थित होते.
शाळा सुरू करताना शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात आणि पालकांचे संमतीपत्र घेण्यासंदर्भात सूचना यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि मुख्याधिकारी रवी पवार यांनी उपस्थितांना दिल्या.