माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आणि चालू लोकसभा निवडणुकीतील एनडीए आघाडीचा हसन मतदारसंघातील उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे केवळ कर्नाटकतील वातावरणच ढवळून निघाले नसून त्याचे पडसाद आता राष्ट्रीय पातळीवरही उमटू लागले आहेत. या सेक्स स्कँडलची व्याप्ती मोठी आहे. ती एक-दोन प्रकरणापुरती मर्यादित नाही, तर एका भाजप नेत्याच्याच म्हणण्यानुसार रेवण्णाचे तब्बल 2 हजार 976 व्हिडिओ मिळाले आहेत. हा मामला अपेक्षेपेक्षाही कितीतरी गंभीर आहे. याची जाहीर वाच्यता होताच प्रज्वल रेवण्णा शनिवारी विदेशात पळून गेले आहेत. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक एसआयटीही नेमली आहे. साधारणपणे निवडणुकांचा मोसम आला की असे व्हिडिओ चर्चेत येतातच. पण तसे हे सर्वसाधारण प्रकरण नाही. त्याची व्याप्ती मोठी असल्याने भाजपलाही बॅकफूटवर जावे लागले असून जेडीएस पक्षातूनच रेवण्णा यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेसनेही हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर उचलून धरला असून आज काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी यात थेट पंतप्रधान मोदींनाही दोष दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की प्रज्वल रेवण्णा यांच्या या कृत्याची माहिती प्रदेश पातळीवरील भाजप नेत्यांना होती. दिल्लीपर्यंत त्याची चर्चा झाली होती. जेडीएस पक्षाशी निवडणूक युती करू नका असे निवेदन भाजपच्या नेत्यांनीही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना सादर केले होते. ही सगळी माहिती असतानाही, पंतप्रधान मोदी रेवण्णा यांची जाहीरपणे स्तुती करताना दिसले आहेत, त्यांच्यासाठी मतदानाचे आवाहनही करताना ते दिसले आहेत, असा घणाघात सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे. रेवण्णा यांची अशी हजारो प्रकरणे असून त्यांनी 63 वर्षीय वृद्धेवरही लैंगिक अत्याचार केल्याची बाब या व्हायरल व्हिडिओतून समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही बाब पंतप्रधान व भाजपच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांना माहिती होती हा सुप्रिया श्रीनेत यांच्या आरोपात तथ्य आहे.
कारण, भाजपचेच कर्नाटकातील एक नेते देवराज गौडा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच एक लेखी निवेदन देऊन रेवण्णा किंवा त्यांच्या पक्षाशी युती करू नये, असे त्यांना कळवले होते. रेवण्णा यांचे तब्बल 2,976 व्हिडिओ एका पेनड्राइव्हवर उपलब्ध असून जेडीएस पक्षाशी भाजपने युती केली किंवा रेवण्णा यांना हसन मतदारसंघात भाजपने पाठिंबा दिला तर हे पेनड्राइव्ह भाजपच्या विरोधात ब्रह्मास्त्रासारखे वापरले जातील आणि त्याचा भाजपला राष्ट्रीय पातळीवरही मोठा फटका बसेल इतक्या स्पष्ट शब्दांत देवराज गौडा यांनी भाजप नेत्यांना या विषयी सावधगिरीचा इशारा दिला होता. त्यामुळे रेवण्णांच्या कृत्याची भाजपला कल्पनाच नसेल असे म्हणता येणार नाही. ही माहिती असूनही भाजपने कर्नाटकात जेडीएस पक्षाशी युती केली आणि खुद्द पंतप्रधानांनी रेवण्णा यांच्या उमेदवारीचे समर्थन करून त्यांना मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटले नसते तरच नवल. भाजपने हा विषय कर्नाटक शाखेवरच सोपवला असल्याचे दिसले.
कर्नाटकातील भाजपच्या पदाधिकार्यांनी रेवण्णा प्रकरणातून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही असे सांगून प्रदेश भाजपचे नेते मोकळे झाले आहेत. भाजपला या प्रकरणात जेडीएस पक्षाची बाजू घेणेही आता अवघड झाले आहे. हसन मतदारसंघात ज्या दिवशी मतदान होणार होते, त्याच्या आदल्या दिवशी रेवण्णाचे व्हिडिओ व्हायरल झाले. तेथे 26 एप्रिलला मतदान झाले त्या दिवशी शुक्रवार होता व शनिवारी रेवण्णा युरोपातील देशात पळून गेले आहेत. कर्नाटकात अजून अनेक मतदारसंघातील मतदान होणे बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात अजून ज्या ठिकाणी मतदान होणे बाकी आहे तेथे भाजपला फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. अशा प्रकरणात मतदार संवेदनशील असतात. हे जेडीएस प्रकरण एकुणातच भाजपच्या अंगाशी आले आहे. आधीच भाजपमध्ये कर्नाटकात मोठ्या प्रमाणात दुफळी आहे. त्यांच्या काही नेत्यांनीच भाजपच्या विरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत.
काही जण काँग्रेसच्या वळचणीला गेले आहेत आणि अशा स्थितीत आता हे जेडीएस नेत्याचे गंभीर प्रकरण लोकांपुढे आले आहे. या प्रकरणात जेडीएस पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची प्रतिक्रिया काय असेल याला महत्त्व होते. त्यांनी सुदैवाने रेवण्णा यांचे समर्थन केलेले दिसले नाही. त्यांनी सावधगिरीनेच प्रतिक्रिया देणे पसंत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली असून त्यातून नेमके काय तथ्य बाहेर येईल त्याची आपण वाट पाहू. जर यात कोणी दोषी असेलच तर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विदेशात पळालेले रेवण्णा यांना आपण तपास यंत्रणांपुढे हजर करणार आहात काय, असे विचारता कुमारस्वामी म्हणाले की, हे काम तपास यंत्रणांच्या अधिकार्यांनीच केले पाहिजे. कुमारस्वामी यांची ही प्रतिक्रिया पाहिल्यानंतर त्यांनाही या सार्या प्रकरणाची पूर्ण कल्पना होती आणि आता रेवण्णा यांचा आपल्याला बचाव करता येणार नाही हेही ते जाणून होते, असे यातून दिसून येत आहे.
एकुणातच हा जेडीएस पक्ष म्हणजे केवळ देवेगौडांचे फॅमिली मॅटर आहे. भाजप-जेडीएस पक्षाच्या युतीत ज्या तीन जागा जेडीएसच्या वाट्याला आल्या आहेत त्या तीन जागांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे पुत्र, नातू आणि जावई हे तीन जण उभे आहेत. म्हणजेच या तिन्ही जागा देवेगौडा कुटुंबाने आपसातच वाटून घेतल्या आहेत. हे जेडीएसचे लोढणे भाजपला केवळ कर्नाटकातच नाही तर कर्नाटक बाहेरच्या राजकारणातही जड जाणार आहे. अटीतटीच्या लढतीत भाजपला हे नुकसान परडणारे नसेल, हे मात्र नक्की.