भाजीपाला विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न….
पुणे (प्रतिनिधी) – मार्केट यार्डातील भुसार विभाग येत्या सोमवारपासून (दि. 25) सुरू होणार आहे. भाजीपाला विभाग सुरू करण्यासाठी बाजार समितीतर्फे प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या मंगळवारी (दि.26) बाजार समिती प्रशासन, श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशन, हमाल पंचायत, टेम्पो आणि इतर संघटनांची बैठक होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली. या बैठकीमध्ये भाजीपाला विभाग सुरू करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर फुल, फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग बंद आहे. नागरिकांना अन्नधान्य आणि किराणाचा पुरवठा व्हावा, या हेतूने गुळ-भुसार विभाग सुरू होता. मात्र, भुसार बाजारातील काही व्यापाऱ्यांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर दि पुना मर्चंट्स चेंबरने 19 मेपासून अनिश्चित काळासाठी भुसार बाजार बंद करण्याची भूमिका घेतली होती. यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख आणि दि पुना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी अध्यक्ष आणि नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये भुसार बाजार सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान 10 एप्रिलपासून भाजीपाला विभाग सुरू आहे. करोना प्रादुर्भावाचा संसर्ग लवकर संपण्याची शक्यता नाही. त्यामुळे बाजार जासत दिवस बंद ठेवणे योग्य ठरणार नाही. हा बाजार सुरू करण्यासाठी बाजार समितीने प्रयत्न सुरू केले आहेत. मंगळवारी विविध संघटनाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.