नवी दिल्ली – देशाचा तिसऱ्या क्रमाकांचा सर्वोच्च किताब असलेल्या पद्मभूषण पुरस्काराच्या चोरीच्या संदर्भातील एक खळबळजनक घटना दिल्लीत उघड झाली आहे. शहराच्या साकेत भागात राहणाऱ्या एका माजी कुलगुरूंच्या घरातून त्यांना मिळालेल्या पद्मभूषण पुरस्काराचे पदक चोरी झाले होते. विशेष म्हणजे या चोरीची त्यांना कल्पनाही नव्हती. मात्र चोरट्यांनी ते पदक विकण्याचा प्रयत्न केला आणि ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलिप नावाच्या आभूषणांची विक्री करणाऱ्या दुकानचालकाकडे हरि सिंह, रिंकी देवी आणि वेदप्रकाश नावाचे तीन आरोपी गेले होते. त्यांना ते पद्मचे पदक विकायचे होते. दुकानदाराला संशय आल्यामुळे त्याने ते खरेदी करण्यास नकार दिला आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांचे पथक त्या दुकानावर पाहोचेपर्यंत आरोपी फरार झाले होते.
प्रकरणाचे गांभीर्य ध्यानात घेत विशेष टीम तपासासाठी रवाना करण्यात आल्या. आपण मदनपूर खादर भागात राहतो अशी माहिती आरोपींनी दुकानदाराला दिली होती. त्यानुसार सीसीटीव्ही आणि अन्य माध्यमांतून आरोपींची ओळख पटवण्यात आली व पदक विक्री करण्यासाठी गेलेले तीघे आणि अन्य दोन जण अशी पाच जणांना अटक करण्यात आली.
श्रवण कुमार, हरि सिंह, रिंकी देवी, वेदप्रकाश आणि प्रशांत विश्वास अशी आरोपींची नावे आहेत. यातील श्रवण कुमार हा पद्म पुरस्कार विजेते जी. सी. चॅटर्जी यांच्या घरी त्यांचा सहायक म्हणून कामाला होता. चटर्जी हे पंजाब आणि राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. तसेच ते केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अर्थात यूपीएससीचे सदस्य आणि नॅशनल बुक ट्रस्टचेही अध्यक्ष राहीले आहेत.