डिडौरी – मध्य प्रदेश राज्यातील डिंडौरी जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात 14 जण ठार, तर 20 जण जखमी झाले आहेत. बडझर घाटात गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या मृतांमध्ये सात पुरुष, सहा महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मृत आणि जखमी डिंडौरी जिल्ह्यातील शाहपुरा तालुक्यातील रहिवासी आहेत. हे सर्वजण मिळून देवरी येथे देवदर्शनासाठी गेले होते.
देवदर्शनावरुन परतत असताना बडझर घाटात पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. त्यानंतर वाहन 40-50 फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले.
हा अपघात इतका भीषण होता की, अनेकांचे मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळून आले. त्यामुळे काही मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले. काही मृतदेहांची ओळख पटली असून उर्वरीत मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
दरम्यान, जखमींनाही तातडीने वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.