विघ्नहरासमोर संत्राफळांची आरास
ओझर – संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेले श्रीक्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहर गणपतीसमोर संत्राफळांची आरास करण्यात आली होती. दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे पाच वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे, उपाध्यक्ष रंगनाथ रवळे, सचिव आनंदराव मांडे, खजिनदार किशोर कवडे, विश्वस्त राजश्री कवडे, ग्रामस्थ अविनाश जाधव, अशोक कुटे यांच्या हस्ते श्रीस अभिषेक करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
पहाटे पाच ते रात्री आकरापर्यंत रांगेत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी साडेसात आणि दुपारी बारा वाजता मध्यान्ह आरती करण्यात आली. विशेष म्हणजे श्री विघ्नहरासमोर संत्रीच्या फळांची आरस भैरवनाथ केट्रस (राजू येधे) यांच्या वतीने खकरण्यात आली होती. रविवारी सायंकाळी सात वाजता नियमित हरिपाठ वाचन करण्यात आले व चंद्रोदयापर्यंत हभप जयवंत महाराज नेहरकर (माणिकडोह-खामगाव) यांचे चंद्रोदयापर्यंत हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत रामप्रसादिक भजन मंडळ यांनी दिली. यावेळी गणपत बोडके यांनी अन्नदान केले. पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत लाखो भाविकांनी दर्शन घेतले. रात्री साडेदहा वाजता शेजआरती करून अकरा वाजता मंदिर बंद करण्यात आले.
हरीनाम सप्ताहाच्या नियोजनाची बैठक
यावेळी श्रीगणेशाच्या अखंड हरीनाम सप्ताहाचे नियोजन करण्यासाठी ग्रामसभा आयोजित केली होती सदर सभेस ग्रामस्थ, तरुण वर्ग महिला बचत गट मोठ्या प्रमाणात हजर होते. चालू वर्षीचा सप्ताह विशेष असा करायचे अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त युवासेना जिल्हाप्रमुख गणेश कवडे, विश्वस्त गणपत कवडे, कैलास घेगडे, मंगेश मांडे, मिलिंद कवडे, कैलास मांडे, विजय घेगडे, श्रीराम पंडित यांनी दिली.