आकर्षणाचा केंद्रबिंदू; प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी
कराड (प्रतिनिधी) – शिवकालीन हत्यारे व ऐतिहासिक वस्तू सर्वांचे आकर्षण ठरत असतात. हे शस्त्रास्त्र व वस्तू पाहण्याची पर्वणी कराडकरांना लाभली असून तलवारी, कट्यारी पासून ते आसूड व चिलखतापर्यंत अशी विविध शस्त्रास्त्रे व त्यांचे प्रकार पाहण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी कराड परिसरातील आबालवृद्ध मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
विजय दिवस समारोह समितीकडून बांगला मुक्तिसंग्राम विजयाच्या प्रित्यर्थ कराडमध्ये प्रतिवर्षी विजय दिवस समारोह साजरा केला जातो. येथील लिबर्टी मैदानात शनिवारपासून शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी खुले झाले आहे. येथे शिवकालीन काळापासून ब्रिटिश काळातील युद्धामध्ये वापरलेली शस्त्रास्त्रे व वैविध्यपूर्ण वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. यात विविध प्रकारच्या तलवारी, कट्यारी व त्यांचे प्रकार, आसूड, शिवकालीन तेलाच्या बुधल्या, दारुखाने, कुऱ्हाड व त्यांचे विविध प्रकार, ब्रिटिशकालीन गाळणी, दिव्यांचे प्रकार, शिवकालीन ठासणीची बंदूक, धोप नावाची तलवार, घोड्यांचे नाली व अन्य साहित्य, जुन्या काळातील कुलपाचे प्रकार, खंजीर व त्याचे विविध प्रकार आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकन व इंग्लंड मेड तलवार, भाल्यांचे प्रकार, दानपट्टे, चिलखत, धनुष्यबाणाचे प्रकार, गुप्त्यांचे प्रकार ही याठिकाणी पहावयास मिळत आहेत. माडू नावाचे शस्त्र येथे हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. हत्ती व माणूस यांच्यामध्ये साठमारीचा खेळ शिवकालीन काळात होत होता.
या खेळांमध्ये या माडू नावाचे शस्त्र वापरले जायचे. हे शस्त्र प्रदर्शनात ठेवलेले आहे. तसेच शत्रूने आपल्यावर केलेला हल्ला वाचवण्यासाठी चिलखत घातले जात होते. त्यामुळे तलवारीने किंवा भाल्याने मावळ्यांवर हल्ला केल्यास याचा चिलखतावर काहीही परिणाम होत नव्हता. यावर गुर्ज नावाचे शस्त्र शिवकालीन काळात तयार करण्यात आले होते. चिलखत घातल्यानंतरही या शस्त्रांमुळे इजा करता येत होती. युद्धातील शस्त्रांसह त्या काळातील सोनाराचा भाता, विटा बनवण्याचा भेंडा, झुलत्या पुलाच्या कड्या, ताक हलवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रव्या याही पहावयास मिळत आहेत. हे प्रदर्शन पहावयास मोठी गर्दी होऊ लागले आहे. शस्त्रास्त्र पाहिल्यानंतर शिवकाळाची अनुभूती येत आहे.
काही राजघराण्यांनी व हौशी लोकांनी शिवकालीन काळापासून ते ब्रिटिश काळापर्यंत वापरात आलेली हत्यारे व अन्य विविध वस्तूंचा संग्रह केलेला असतो. त्या वस्तू सर्वसामान्य लोकांना पहावयास मिळाव्यात, यासाठी त्यांनी प्रदर्शनात मांडण्यासाठी आम्हाला भेट दिलेल्या आहेत. हे प्रदर्शन महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटकात असे मिळून 484 वेळा भरलेले आहे. सर्वच ठिकाणी लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
डॉ. प्रमोद बोराडे ,इतिहास संशोधक, तळेगाव दाभाडे
कराड :विजय दिवस समारोहानिमित्त शनिवारपासून लिबर्टी मैदानात शिवकाळासह ब्रिटीशकाळापर्यंत वापरण्यात आलेली हत्यारे व उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. यामध्ये चिलखत, गुर्ज नावाची शस्त्रे, ब्रिटीश कालीन बंदूक, माडू नावाचे शस्त्र, विशेष आकर्षण ठरत आहेत.
(छाया : एस. व्ही. डुबल)