ऑनलाइन शिक्षणात “रयत’ची भूमिका महत्त्वाची : शरद पवार

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात

सातारा – कोविड 19 विषाणूचे संकट संपूर्ण जगावर आहे. या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी रयत शिक्षण संस्थेने ऑनलाइन अध्यापनासाठी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. संस्थेचे अधिकारी आणि शिक्षकांचे हे काम संस्थेच्या शंभर वर्षांच्या लौकिकाला साजेसे आहे, असे उद्‌गार संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त बुधवारी झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते. पवार म्हणाले, करोनामुळे सर्वच क्षेत्रात नकारात्मक भावना झाली आहे.

या प्रतिकूल काळात गोरगरीब विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाइल यासारख्या साधनांची कमतरता असतानाही “रोझ’ प्रकल्प राबवून संस्थेने इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 70 टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण आपण देऊ शकलो, ही समाधानाची बाब आहे. त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती नसल्याने डोंगरदऱ्यातील, आदिवासी भागातील 30 टक्के विद्यार्थी इंटरनेटच्या अभावामुळे शिक्षणापासून दूर राहिल्याचीही खंत आहे.

 

ही तफावत दूर करण्यासाठी भविष्यात आपल्याला जोमाने काम करावे लागेल. ही जबाबदारी संस्था पार पाडेल, याची खात्री आहे. दरम्यान, जयंतीचे औचित्य साधून सन 2020 चे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार आणि रयत माउली सौ. लक्ष्मीबाई पाटील राष्ट्रीय पुरस्कार अनुक्रमे शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख व अहमदनगर जिल्ह्यात सामाजिक कार्य करणाऱ्या सौ. राहिबाई सोमा पोपरे यांना जाहीर करण्यात आला.

अडीच लाख रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल, जनरल बॉडी सदस्य, आजीव सदस्य, रयतसेवक उपस्थित होते. तत्पूर्वी, उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड, माध्यमिक विभागाचे सहसचिव संजय नागपुरे, ऑडिटर डॉ. शिवलिंग मेणकुदळे, मध्य विभागाचे अधिकारी राजेंद्र साळुंखे, कायदा सल्लागार ऍड. दिलावर मुल्ला, समन्वयक डी. एस. सूर्यवंशी व मान्यवरांनी कर्मवीर समाधीस अभिवादन केले. सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.