पाणी वाहून जाण्यासाठी रस्ताच फोडला

पावसाचे पाणी  रस्त्यावर जमा
शेरे गावातील स्थिती : ठेकेदाराने कॉंक्रिटीकरण करताना मोऱ्याच केल्या नाही

पिरंगुट – शेरे (ता. मुळशी) येथे पाणी वाहून जाण्यासाठी मोरी न टाकताच सिमेंट रस्ता करण्यात आला. त्यामुळे पावसाचे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने अखेर मोरी असलेल्या ठिकाणी रस्ता फोडावा लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे-कोलाड महामार्गाचे काम वेगात सुरू होते. शेरे ते जामगाव दरम्यान या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरणही करण्यात आले. मात्र, येथे पाणी जाण्यासाठी असलेल्या तीन मोऱ्या ठेकेदाराने न टाकता हे सर्व पाणी एकाच मोरीत आणून सोडले.

गेल्या आठवड्यात या भागात झालेल्या पावसाचे पाणी रस्त्याच्या बाजूला तीन ते चार फूट साचून रस्त्यावरून वाहत होते. डोंगरावरून वाहत येणारे पाणी मुख्य रस्ता पार करून मुळा नदीला जाऊन मिळते. रस्त्यावरून वाहत असलेल्या पाण्यामुळे लक्ष्मीनारायण मंदिराच्या परिसरातील शेतीचे नुकसान होऊन वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. यामुळे या परिसरातील शेतकरी वर्गाने अभियंता व ठेकेदार यांच्या विरोधात संताप व्यक्त केला.

या घटनेची माहिती संदर्भात तहसीलदार अभय चव्हाण यांना माजी सभापती कोमल वाशिवले यांनी निवेदन देऊन येथील साचलेले पाणी जाण्यासाठी मोरी तात्काळ मोकळी करावी असे निवेदन दिल्यानंतर येथील सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आलेला रस्ता फोडण्यात आला व साचलेले पाणी वाहण्यासाठी मोकळी वाट करून देण्यात आली.

शेरे येथे पाणी साचून झालेल्या दुरवस्थेची पाहणी माजी आमदार शरद ढमाले, जिल्हा परिषद सदस्य अंजली कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्याध्यक्ष अंकुश मोरे, रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे संपर्क प्रमुख श्रीकांत कदम, विश्‍वनाथ जाधव, चंद्रकांत ढमाले, अंकुश जाधव, शशिकांत ढमाले यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.