मंचर –आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथील आवठडावस्ती येथे शेतकरी दत्तात्रय पांडुरंग हिंगे यांच्या जनावरांच्या गोठ्यातील एक शेळी बिबट्याने फस्त केली आहे. यामुळे शेतकरी दत्तात्रय हिंगे यांचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
वनविभागाने परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यापूर्वीही शेटे-गुणगे मळ्यात उसाच्या शेतात बिबट्याची पाच पिल्ले होरपळून मृत पावल्याची घटना घडली होती. त्यावेळी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली होती. आवठडावस्ती येथे बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.