नीलकंठ मोहिते
इंदापूर –
तेने सुखी माझे निवविले अंग।
विठ्ठल हे जग देखीयेले।।
तुका म्हणे सुख झाले माझ्या।
जीवा रंगलो केशवा तुझ्या रंगे।।
ज्ञानोबा माऊली हे पखवाजातून, टाळातून आणि मुखातून येणारा एकसंध आवाज व हरिनामाचा जयजयकार, पताकावाले, हंडेवाल्या-तुळशिवाल्या भगिनी व वीणेकरी टाळकऱ्यांच्या, प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रदक्षिणा करून इंदापूर येथील संत तुकाराम महाराज पालखी गोल रिगणासाठी चोपदारांनी सुरुवात केली. मानाच्या अश्वाने क्षणाचा विलंब न लावता तब्बल चार परिक्रमा पूर्ण करून लाखो लोकांच्या नयनांचे पारणे फेडले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानाचे गोल रिंगण इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात सकाळी 11.04 मिनिटांनी सोहळ्यातील नगारखाना रिंगण स्थळावर दाखल होताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत हरिनामाचा जयघोष करीत, पालखी विश्वस्तांचे, चालणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत केले. तद्नंतर तुकोबारायांच्या पालखी रथासमोरील चालणाऱ्या दिंड्या यांना रिंगणात प्रवेश देण्यात आला. पालखी रथ व मानाचे अश्व यांचे पूजन रिंगणस्थळावर करण्यात आले. इंदापूर नगर परिषदेच्या वतिने, प्रशासनाच्या वतीने तसेच इंदापूरकरांनी स्वागत केले.
सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शेतकरी नागरिक भक्तगण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. रिंगण सोहळा आटोपताच संत तुकाराम महाराज पालखी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात एकदिवसीय मुक्कामासाठी दाखल झाली. भव्य पालखी स्थळ निर्माण केल्यामुळे पालखीतील दिंडेकरांची व्यवस्था चोख झाली. आज (23 जून) पालखी सोहळा पहाटेची महापूजा होऊन पुणे जिल्ह्यातील शेवटच्या सराटी गावी नीरा नदीच्या तीरावर मुक्कामी पोहचणार आहे. तसेच नीरा नदीत संत तुकोबारायांच्या पालखीतील पादुकांना स्नान घातले जाणार आहे. पुणे जिल्ह्याची हद्द संपून नीरा नदीच्या पलीकडे सोलापूर जिल्ह्यात नीरा स्नानानंतर, पालखी दाखल होणार आहे.
नेते, अधिकार, पत्रकार धावले
इतिहासात पहिल्यांदाच भाजप-शिवसेना या पक्षाचे खासदार, आमदार यांनी रिंगणाला हजेरी लावली व संत तुकोबारायांच्या पालखीचे दर्शन घेतले. मुंबईचे खासदार राहुल शेवाळे, खासदार धनंजय महाडिक, आमदार आशिष शेलार, राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रिंगण सोहळ्यात फुगड्या, झिम्मा, लगोरी, खेळ वारकरी खेळले, तहसीलदार श्रीकांत पाटील, हर्षवर्धन पाटील तसेच प्रशासकीय अधिकारी, पत्रकार यांनी रिंगण सोहळ्यात पळत प्रदक्षिणा केली.