धिरेंद्र गायकवाड कात्रज, दि. 13 -पुणे शहर तसेच उपनगरांमध्ये विना नंबरप्लेटची वाहने मोठ्या संख्यने धावत असल्याचे निदर्शनास येत आहेत. यामध्ये अवजड व्यावसायिक वाहने, दुचाकी तसेच चार चाकी अगदी पाण्याचे टॅंकर अशा वाहनांचा समावेश आहे. पोलीस कारवाई थंडावल्याने विना नंबरप्लेट वाहन चालविण्याचे “फॅड’ अनेकांच्या डोक्यात शिरले आहे. या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष असल्याने अशा वाहनांचे प्रमाण वाढत आहे.
कात्रज परिसरात अशी अनेक वाहने दिसून येत आहेत. काही वाहनांची दर्शनी पुढील भागाची नंबर प्लेट गायब असते तर काहींची मागील बाजुची नंबर प्लेट नसते तर काही वाहन चालकांनीपुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट काढलेल्या असतात, अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून अद्याप पर्यंत तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. विना नंबरप्लेटचे वाहन रस्त्यावर दिसताच अन्य चालकांच्या ते निदर्शनास येते तसेच असे वाहन कोणत्या बेकायदशीर कामासाठी तर वापरले जात नाही ना? अशीही शंका येते. ही बाब पोलिसांच्या लक्षात येत नाही, याबाबत आश्चर्च व्यक्त केले जात आहे.
कात्रजमार्गे महामार्गांवर…
कात्रज परिसरातून पुणे-बेंगलोर तसेच पुणे-मुंबई या दोन महामार्गांकडे वेगाने जाता येते. तसेच, कात्रज बाह्यवळण मार्गाने बोपदेव घाट तेथून सासवड-बारामतीच्या दिशेने तसेच उंड्री-पिसोळी-उरूळी देवाची येथून हडपसर वरून पुणे-सोलापूर महामार्गावर सहज जातो येते. याच कारणामुळे कात्रज परिसरात विना नंबरप्लेटची वाहने मोठ्या प्रमाणात आढळून येत असतील तर ही बाब गंभीर आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी अशी वाहने मोठ्या संख्यने निदर्शनास येत असल्याने त्यांची तपासणी पोलिसांनी करणे गरजेचे आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी गांभर्याने कारवाई करावी, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
धनकवडी, कात्रज, भारतीय विद्यापीठ परिसर, मोरेबाग परिसर, सुखसागर नगर, संतोष नगर, आंबेगाव पठार या भागांमध्ये रस्त्यावर अनधिकृत पार्किंग केलेली वाहने आढळून येत आहेत. या वाहनांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
…लढविली जाते ही “शक्कल’
सिग्नल तोडल्यानंतर सिग्नलवरील सीसीटीव्हीमध्ये वाहनांचे नंबर दिसतात. यावरून वाहतूक पोलिसांकडून संबंधीत वाहनाच्या नंबरच्या आधारे दंडाची रक्कम त्या चालकांच्या नावे टाकली जाते. त्यामुळे आपल्या वाहनाचा नंबरच दिसू नये यासाठी वाहन चालक नंबरप्लेट काढून टाकत असल्याचे तसेच त्या वाकड्या, पुसट करून ठेवत असल्याचे मिळालेल्या माहितीवरून समजते. दंड टाळण्यासाठी ही शक्कल लढविली जात असेल तर वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर दुहेरी दंड आकारणी करणे गरजेचे ठरत आहे.
विना नंबरप्लेट वाहनांवर वाहतूक पोलीस विभागांमार्फत सर्रास कारवाई होत आहे. विना नंबर प्लेट करता एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. या रकमेत वाढ करण्यासह त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतही प्रयत्न करण्यात येतील.
– दादासाहेब चुडप्पा, वरीष्ठ पोलीस निरीक्षक,
भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस नियंत्रण विभाग.