मागविला कॅमेरा, मिळाला रिकामा बॉक्‍स

ग्राहक मंचाचा फ्लिपकार्ट कंपनीला दणका : कॅमेऱ्याची किंमत, नुकसानभरपाईचा आदेश

पुणे – ऑनलाइन कॅमेरा मागविल्यानंतर रिकामा खोका देत ग्राहकाची फसवणूक फ्लिपकार्ट इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला महागात पडले आहे. संबंधित कॅमेऱ्याची रक्‍कम 9 टक्के व्याजाने परत देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. याबरोबरच तक्रारदारास शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी 15 हजार नुकसानभरपाई म्हणून द्यावेत, असे मंचाचे अध्यक्ष अनिल खडसे आणि सदस्य क्षीतिजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.

याबाबत सिंहगड रोड येथील श्रवण अपार्टमेंटमधील गौरांगी देशमुख यांनी बंगळुरू येथील फ्लिपकार्ट इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड विरोधात ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. गौरांगी यांनी 4 फेब्रुवारी 2018 रोजी प्रतिवादी फ्लिपकार्टकडून ऑनलाइन शॉपिंगद्वारे “निकॉन डीएसएलआर’ कॅमेरा मागविला होता. त्यासाठी त्यांनी नेटबॅंकिंगद्वारे 28 हजार 990 रुपयेही दिले होते.

दि. 5 फेब्रुवारी म्हणजे ऑर्डर केल्याच्या दुसऱ्या दिवशी खरेदी केलेल्या कॅमेऱ्याचा बॉक्‍स डिलिव्हरी बॉयने बिल्डिंगच्या सुरक्षारक्षकाकडे दिला. परंतु, जेव्हा गौरांगी यांनी तो बॉक्‍स उघडला. तेव्हा त्यांना बॉक्‍समध्ये कॅमेरा आढळला नाही.

तसेच तो बॉक्‍स रिकामा असल्याचे दिसले. पाठवलेल्या पार्सल बॉक्‍सचे पॅकेजिंग व्यवस्थित नव्हते. तक्रारदारांचे वडील दिलेल्या पत्त्यावर घरी होते. असे असताना तक्रारदार गौरांगी यांनी कॅमेरा दुसऱ्याकडे देण्याबाबत सांगितले नसताना कॅमेरा सुरक्षारक्षकाडे देण्यात आला.

त्याच दिवशी तक्रारदार यांनी फ्लिपकार्टकडे कॅमेऱ्याचा रिकामा बॉक्‍स मिळाल्याची तक्रार दिली. त्यावर प्रतिवादींकडून तक्रारीचे निरसन करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. दि.9 फेब्रुवारी रोजी तक्रारदारांना प्रतिवादींकडून फोन आला. तो कॅमेरा शेजारील बिल्डिंगच्या सुरक्षारक्षकाकडे सापडला असल्याचे सांगून “सिल फोडलेला कॅमेरा त्यांना घ्या,’ असे त्यावेळी सांगण्यात आले.

त्यावर तक्रारदारांनी तो कॅमेरा घेण्यास नकार दिला. त्यानंतर प्रतिवादींनी कॅमेरा बदलून देण्यास तयारी दर्शवली, परंतु, अशा वाईट अनुभवामुळे तक्रारदारांना प्रतिवादींकडून वस्तू नको होती. त्यांना पैसेच परत हवे असल्याची भूमिका घेतली. तक्रारदारांना अद्यापपर्यंत पैसेच न मिळाल्याने त्यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल करून स्वतः बाजू मांडली. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मंचाने तक्रारदारांच्या बाजूने निकाल दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)