नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यासह ८ केंद्रीय मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागेल. त्याशिवाय, प्रमुख उमेदवारांमध्ये दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचाही समावेश आहे.
महाराष्ट्रातील नागपूरमधून विजयाची हॅट्ट्रिक करण्याचे लक्ष्य समोर ठेऊन गडकरी निवडणूक लढवत आहेत. पहिल्या टप्प्यात निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या इतर केंद्रीय मंत्र्यांमध्ये किरेन रिजीजू, सर्बानंद सोनोवाल, संजीव बालियान, जितेंद्र सिंह, भुपेंद्र यादव, अर्जुनराम मेघवाल, एल.मुरूगन यांचा समावेश आहे.
रिजीजू अरूणाचल प्रदेश, सोनोवाल आसाम, बालियान उत्तरप्रदेश, तर सिंह जम्मू-काश्मीरमधून नशीब आजमावत आहेत. यादव आणि मेघवाल राजस्थानमधून रिंगणात उतरले आहेत. मुरूगन तामीळनाडूतून निवडणूक लढवत आहेत.
तेलंगणाच्या माजी राज्यपाल तामीळीसाई सौंदरराजन भाजपच्या उमेदवार म्हणून तामीळनाडूतून लोकसभा निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. त्रिपुरामधून माजी मुख्यमंत्री बिप्लबकुमार देव यांनी भाजपचे उमेदवार म्हणून दंड थोपटले आहेत. निवडणूक रिंगणात असणारे दुसरे माजी मुख्यमंत्री सोनोवाल आहेत.