जिल्हा प्रशासनाने दिली माहिती
पुणे – मतदान न करण्याची कारणे जिल्हा प्रशासनाकडून शोधण्यात आली आहे. त्यानुसार खासगी कंपनीत काम करीत असल्याने कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळत नाही, भ्रष्टाचारामुळे राजकीय व्यवस्थेविरुद्ध चीड, उमेदवार माहित नाही, सलग सुट्टी असल्याने बाहेर गावी जाणे, मतदान केंद्र लांब आहे, अशी कारणे मतदारांनी दिली आहेत.
मतदान न करण्याची कारणे शोधण्यासाठी एका संस्थेने सर्वेक्षण केले आहे. त्यासंबंधीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त केला आहे. त्यामुळे ही कारणीमिमांसा नमूद करण्यात आली आहे. या अहवालात मतदान न करण्याची प्रामुख्याने 23 कारणे नमूद करण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यात 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाकडून ठेवण्यात आले आहे.
आयपीएल मधील क्रिकेटचा सामना हेही मतदार घराबाहेर न पडण्याचे एक कारण आहे. मतदार यादीत नाव नव्हते, मतदान केंद्रांची माहिती नाही. नोकरीनिमित्त बाहेर गावी. घरातील ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबातील सदस्य मतदान केंद्रावर नेण्यास टाळाटाळ करतात. प्रलोभन सांगितल्याशिवाय मतदान नाही. आजारपणामुळे जाणे शक्य नही. मतदान केंद्राबाहेर स्थानिक गुन्हेगारी अथवा गुंड प्रवृत्तीचे लोक बुथवर बसून वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग करण्याची भिती आदी कारणे मतदान न करण्याची नागरिकांनी दिली आहे.