पुणे -…आता कॅबचालकांचाही आडमुठेपणा!

भाडे नाकारण्याची खोड : प्रवाशांना नाहक मनस्ताप

पुणे – प्रवासी कॅब कंपन्यांच्या आडमुठेपणामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांप्रमाणे आता कॅबचालकांचा भुर्दंड विनाकारण प्रवाशांना पडत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

गेल्या काही वर्षांपासून बस, रिक्षा आदी वाहतूक प्रकारांना बाजूला करत पुणे शहरात देखील “कॅब’ कंपन्यांनी प्रवाशांना भूरळ घातली. शहरातील वाहतूक समस्या लक्षात घेता प्रवासी अनेकदा “कॅब’ला “प्रेफरन्स’ देत आहेत. मात्र, त्यांच्या सेवेतील काही जाचक अटींमुळे प्रवासी सध्या या सेवांबाबत नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

जवळचे भाडे नाकारणे, जादा भाडे मागणे, प्रवाशांशी उद्धटपणे वागणे आदी प्रवाशांच्या तक्रारी रिक्षाच्या बाबतीत प्रवासी वारंवार करताना दिसतात. परंतु “कॅब’चालकही याच पद्धतीने प्रवाशांशी वागत असल्याने त्यांच्याविरोधात तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत कॅब कंपन्यांच्या सोशल मीडिया हॅन्डल आणि संकेतस्थळावर प्रवासी याबाबतीत संताप व्यक्त करत आहेत. प्रवाशांच्या तक्रारीमध्ये कंपनीच्या दरपत्रकापेक्षा अतिरिक्त भाडे आकारणे, राईड कॅन्सलेशन चार्ज आकारणे, भाडे स्वीकारण्याबाबत चालकांच्या तक्रारी, ड्रॉप लोकेशन न स्वीकारणे आदींचा समावेश होतो.

...किमान सोशल मीडियावर दिलासा
सुरूवातीला सवलती आणि तत्परतेने सेवा देण्यामुळे “कॅब’ कंपन्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या होत्या. परंतु आता प्रवासी असमाधानी असल्याचे दिसत आहे. विविध पद्धतीतून “कॅब’ चालकांकडून होणाऱ्या कोंडीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसत आहे. याबाबत प्रवाशांनी सोशल मीडियावर तक्रार केल्यास “कॅब’ कंपन्यांकडून दिलगिरी व्यक्त केली जात असून प्रवाशांच्या तक्रारीवर तोडगा काढणार असल्याचे आश्‍वासन प्रवाशांना दिसत आहे. कंपनीच्या याप्रकारे मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया प्रवासी देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.