संघर्षातून कोणाचाच विकास होत नाही

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले : सोनगाव येथे प्रचार सभा

शेंद्रे – आजवर पार्टी व गट म्हणून आपण प्रत्येक जण भांडलो, मात्र ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपण बदलू शकत नाही. मात्र नव्याने संघर्ष वाढू नये म्हणून म्हणून आता नवे पर्व सुरू केले आहे. भांडणातून आणि संघर्षातून कोणाचाच विकास होत नाही आणि काहीही साध्य होत नाही.शिवछत्रपतींच्या घराण्याचे वलय आपापसातील वादामुळे मलिन होऊ नये, म्हणून हा संघर्ष थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला. कार्यकर्त्यांनीही गुण्या गोविंदाने राहावे व एकत्रित प्रयत्न करून उदयनराजेंना प्रचंड मतांनी विजयी करूया असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी, कॉंग्रेस, आणि मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ सोनगाव ता. सातारा येथे आयोजित शेंद्रे व परळी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीच्या माहिती व तंत्रज्ञान सेलचे सारंग पाटील, माजी सभापती सुनील काटकर, बाजार समितीचे माजी सभापती राजू भोसले, बाजार समितीचे सभापती ऍड. विक्रम पवार, जितेंद्र सावंत, अरविंद चव्हाण, जि. प. सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण, सौ. कमल जाधव, सौ. वनिता पोतेकर, प्रकाश जाधव, भिकूभाऊ भोसले, हणमंत गुरव, रूपाली जाधव, छाया कुंभार, सूर्यकांत पडवळ, संजय पोतेकर, ऍड. अंकुश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

उरमोडीचे धरण झालं आता कॅनॉल झाले पाहिजे. कारण कॅनॉलमुळेच हरित क्रांती घडेल. मात्र त्यासाठी कॉंग्रेस प्रणित महाआघाडीचे सरकार अस्तित्वात यायला हवे, असे आवाहन करून आमदार शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले की, आजचे केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन आहे. शेती व शेतकरी जिवंत ठेवायचा असेल आणि कृषिप्रधान भारत ही ओळख कायम ठेवायची असेल, तर या निवडणुकीकडे योग्य नजरेने जनतेने पहावे. हे जनतेचे कर्तव्यच आहे. सर्व काही टिकवायचं असेल तर दोन्ही कॉंग्रेसच्या पाठीशी रहा. सध्या देशातील कोणताही घटक सरकारच्या कारभारावर खुश नाही. बळीराजा अगोदरच अडचणीत आला आहे.

सर्वधिक रोजगार निर्मिती करणारे बांधकाम क्षेत्र जीएसटी, नोटबंदी आणि रेरासारख्या चुकीच्या निर्णयामुळे कोलमडले आहे. नोटबंदीच्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांची आणि जिल्ह्याची अर्थवहीनी असणारी जिल्हा मध्यवर्ती बॅंकही अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. अर्थात सर्व निकषांना सामोरे जात आम्ही आमचे नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. मात्र देशात हुकुमशाहीचे अवडंबर माजू द्यायचे नसेल तर सध्याचे सरकार हटवा. यावेळी विक्रम पवार, प्राध्यापक डॉ शिवाजीराव चव्हाण, सौ विद्या देवरे, बचाराम यादव, सोमनाथ गोडसे, अरविंद चव्हाण, जितेंद्र सावंत, उत्तमराव नावडकर, सुरेश पडवळ आदींचीही भाषणे झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.