सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने पुण्याला धुतले
पुणे – गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरांत आर्द्रता वाढली आहे. परिणामी, उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती. उन्हाळ्याप्रमाणे अक्षरश: घामाच्या धारा वाहत असताना शहरात शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसाने सुमारे तासभर हजेरी लावली. यामुळे वातावरणात कमालीचा गारवा पसरला.
शहर परिसरात गेल्या अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर सुरू असलेल्या सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे अनेकांची पुरती तारांबळ उडाली. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राच्या मध्यपूर्व भागात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्चयाची शक्यता आहे. तसेच पुण्यात दि.11 सप्टेंबरपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत शिवाजीनगर वेधशाळेत 34.7, पाषाण येथे 33.3 तर लोहगाव येथे 34.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुण्यावर होते मोठे ढग
हवामान विभागाच्या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पुणे शहर आणि परिसरावर सुमारे 12 ते 15 किमी उंचीचे ढग तयार झाले होते. त्यामुळे कमी काळात जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार हा पाऊस झाला आहे.