पिंपरी – लोकलच्या अनियमित वेळांचा होणारा अडथळा, घाटातील कमी होणारा वेग यासह अनेक कारणांमुळे पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या सिंहगड व डेक्कन क्वीन दररोज उशीरा येत आहेत. परिणामी कामावर वेळेत पोहचण्यास चाकरमान्यांना अडचणी येत आहेत. उशीर झाल्यामुळे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा कारवाईचा बडगा देखील सहन करावा लागत आहे. रेल्वेच्या चुकलेल्या नियोजनाचा नाहक मनस्ताप पिंपरी-चिंचवडमधील चाकरमान्यांना सहन करण्याची वेळ आली आहे.
पुणे ते मुंबईदरम्यान नोकरीनिमित्त दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या अडीच हजार इतकी आहे. सकाळच्या वेळेत सिंहगड एक्स्प्रेस व डेक्कन क्वीन या दोन रेल्वे गाड्यांची सुविधा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सिंहगड एक्स्प्रेस पुण्यावरून सकाळी 6 वाजता निघते व मुंबईत 10 वाजता पोचते. डेक्कन क्वीन सकाळी सव्वा सात वाजता सुटते. मुंबईत साडेदहा वाजता पोचते. दोन्ही रेल्वेला चिंचवड वेळेत रेल्वे गाड्या निघाल्यास चाकरमान्यांना कामावर वेळेत जाता येते.
लोकल रेल्वे उशिराने चालल्यास त्याचा अडथळा सिंहगड व डेक्कन क्वीनला होत आहे. समोरून लोकल रेल्वे आल्यास या दोन गाड्यांचा वेग कमी होत आहे. तसेच घाटात देखील कमी वेगात जावे लागत असल्याने विलंब होत आहे. त्यामुळे लोकल वेळेवर चालविल्यास या अडचणी येणार नाहीत, असा सूर चाकरमान्यांकडून उमटत आहे.
सर्व खासगी आस्थापना व सरकारी कार्यालय यामध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची आहे. पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस व डेक्कन क्वीन या गाड्या दररोज उशिराने धावत आहेत. पासधारक प्रवाशांना आपल्या वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागते. तसेच त्यांच्या वेतनातून पगार कपात होत आहे. यामुळे सिंहगड एक्स्प्रेस व डेक्कन क्वीन या दोन्ही गाड्या मुंबई येथे वेळेवर पोहचणे आवश्यक आहे. – दीपक शेगर, पासधारक.
गेल्या दोन महिन्यांपासून त्रास
गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे गाड्यांना अर्धा ते एक तास उशीर होत आहे. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना कामावर पोचण्यासाठी उशीर होत आहे. परिणामी कार्यालयातील वरिष्ठांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. बायोमेट्रिक हजेरी असल्याने हजेरी उशिरा लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची रजा पडत आहे. पगाराला देखील कात्री लागत आहे. उशिरा आल्याबद्दल मेमो दिला जात आहे. सेवा पुस्तकामध्ये लाल शेरा मिळत आहे. तसेच कामावरून कमी करण्याची धमकी दिली जात आहे.