कात्रेश्‍वरामुळे “कातरपट्टे’चं झालं “कातरखटाव’!

आठशे वर्षांच्या कथेमागची “दंतकथा’
मंदिर बांधण्यासाठी शंभू महादेवांनी शिवदासाला दृष्टांत दिल्याची आख्यायिका
विठ्ठल नलावडे
कातरखटाव  – खटाव तालुक्‍यातील कातरखटाव या गावाचे पूर्वीचे नाव कवठे असे होती. कवठेश्‍वर हे या गावचे ग्रामदैवत. पुढे या गावाला कातरपट्टे असे म्हटले जाऊ लागले आणि त्याचा अपभ्रंश कातरखटाव असा झाला. आता हे गाव कातरखटाव या नावाने ओळखला जाते. या गावाच्या नावातील बदलाची दंतकथा सांगितली जाते. कातरखटावच्या कात्रेश्‍वराची यात्रा, म्हणजे रथोत्सव शनिवार, दि. 22 रोजी होणार आहे.

कातरखटाव गावाच्या नावाबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात. कवठेच्या उत्तर बाजूने कवठाई नदी वाहते. हीच नदी पुढे येरळा नदीस मिळते. या कवठे गावात शिवदास नावाचा गवळी हा शंभू महादेवाचा निस्सीम भक्‍त होता. त्याच्या आयुष्याची संध्याकाळ होत आली होती. मात्र, दर सोमवारी शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या पायी वारीचा नियम त्याने सोडला नव्हता. अशाच एका सोमवारी भल्या पहाटे शिवदास उठला, पाण्याची कावड घेऊन नदीवर गेला, स्नानसंध्या उरकली, कावड पाण्याने भरली आणि हर हर महादेव म्हणत तो शिखर शिंगणापूरचा रस्ता जवळ करू लागला. त्यावेळी गावाच्या उत्तरेस अरण्य होते. त्यातून मार्गक्रमण करत शिवदासानी शंभू महादेवाच्या जपाच्या बळावर शिखर शिंगणापूर गाठले. कावडीतून आणलेल्या कवठाई नदीच्या पवित्र जलाने शंभू महादेवास अभिषेक केला आणि भक्‍तिभावाने हात जोडले. शिवदासाची भक्‍ती पाहून शंभू महादेव प्रसन्न झाले. ते शिवदासला म्हणाले, तुला काय हवं आहे, ते माग. तेव्हा शिवदास म्हणाला, मला काही नको. फक्‍त तूच मला हवा आहेस. त्यावर महादेव म्हणाले, आता तुला इतक्‍या लांब माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही. मीच तुझ्याकडे वास्तव्यास येतो; पण एक लक्षात ठेव, तुझ्या गावापर्यंत जाईपर्यंत मागे वळून बघायचे नाही.

शिवदासाने कावड घेतली आणि कवठेचा रस्ता धरला. शिवदास गावापासून हाकेच्या अंतरावर आला आणि त्याच्या मनात शंका आली की, देव माझ्या मागोमाग आले आहेत का? शंका आल्याने शिवदासाने मागे वळून पाहिले असता, कोणीच दिसलेच नाही. शिवदास निराश झाला. त्याला वाटले देवाने आपल्याला फसवले. तो निराश होऊन घरी आला. विचार करतच झोपी गेला. झोपेत शंभू महादेवांनी शिवदासास दृष्टांत दिला आणि सांगितले की, तू ज्या ठिकाणी मागे वळून पहिलेस, त्या ठिकाणी मी गुप्त झालो. तेथे तुला शिवलिंग सापडेल. शिवदास खडबडून जागा झाला. तो आपली बैलजोडी आणि नांगर घेऊन शंभू महादेवांनी दृष्टांत दिलेल्या ठिकाणी येऊन थांबला. शिवनामाचा जप करत त्याने जमीन नांगरायला सुरुवात केली. जमीन नांगरत असताना शिवदासाला मोठा आवाज ऐकू आला आणि जमिनीतून रक्‍ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. त्या क्षणी नांगर सोन्याचा झाला. रक्‍ताचे रूपांतर पाण्यात झाले आणि शिवलिंग वर आले. मात्र, शिवलिंगाची साळुंखी नांगराच्या फाळाने कातरल्याचे दिसले. त्यामुळे शिवलिंगास “कात्रेश्र’ म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यामुळे कवठेचे नाव कातरपट्टे, असे झाले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत आजचे “कातरखटाव’ झाले. अशी दंतकथा असलेल्या कात्रेश्‍वराची बदलती यात्रा दि. 21 ते दि. 23 या कालावधीत होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.