पुणे –पुणे विमानतळावरील कार्गो सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक असणारी जागा संरक्षण मंत्रालयाने एक रुपये नाममात्र दराने वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रलंबित असणारा जागेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
पुणे विमानतळावरील टर्मिनलचे बांधकाम आणि विस्तारीकरण करण्यात येत आहे. यासह व्यापारासाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या कार्गोचा प्रश्न देखील मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मात्र, आता संरक्षण मंत्रालयाने जागेबाबतचा निर्णय घेतल्याने कार्गोच्या कामास गती मिळणार आहे. बीएसओ यार्डमधील अडीच एकर जागेसाठी संरक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी आकारण्यात येणारे 1 कोटी 38 लाख 30 हजार 787 रुपये भाडे कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.
अडीच एकर जागेसाठी भाडे कमी करून नाममात्र भाडेपट्ट्याने जागा मिळण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना दि. 8 फेब्रुवारीला पत्र पाठवले होते. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी आकारलेल्या भाड्याऐवजी एक रुपये नाममात्र दराने जागा वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता कार्गोसाठी जागा उपलब्ध होणार असून, मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लागला आहे, अशी माहिती विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांनी दिली.