पिंपरी – शहरातील छोट्या व मध्यम उद्योगांच्या रासायनिक सांडपाण्यामुळे पवना, मुळा व इंद्रायणी या नद्या प्रदुषित होत आहे. उद्योगांजवळ मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्र नसल्याने मुख्यत: हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रस्ताव अद्याप कागदावरच राहिला आहे. याबाबत गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्याचे आदेश राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) दोन महिन्यांपूर्वी दिले. मात्र, त्यानंतरही एमआयडीसीने काहीही ठोस हालचाल केलेली नाही.
शहरातील नद्यांमध्ये होणाऱ्या प्रदुषणाबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधात पुणे येथील न्यायालयात फौजदारी खटला दाखल आहे. शहरातील छोट्या व मध्यम उद्योगांच्या रासायनिक सांडपाण्यामुळे पवना, मुळा व इंद्रायणी नदीच्या प्रदुषणात भरच पडत आहे. महापालिका व एमआयडीसी याबाबत चिडीचूप आहेत. उद्योगांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने विस्तृत प्रकल्प अहवाल देखील तयार केला होता.
मात्र, केंद्र उभारण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष कार्यवाही काहीच झालेली नाही. हा विषय मार्गी लागावा, यासाठी माजी खासदार गजानन बाबर यांनी राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यांनी त्याची दखल घेत मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्राबाबत गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्याचे आदेश एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अलबनगन यांना 27 ऑक्टोबर 2020 रोजी पत्रानुसार दिले.
तसेच, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता (पुणे) यांनाही त्याबाबत कळविले होते. एमआयडीसीकडून दोन महिने उलटले तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर (एमसीसीआयए), महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांची संयुक्त बैठकही अद्याप झालेली नाही.
मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्राबाबत येत्या 15 दिवसांमध्ये निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या चिंचवड येथील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
एमआयडीसीकडून आठवडाभरात बैठक
उद्योगांसाठी उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्राबाबत निर्णय घेण्यासाठी पुढील आठवडाभरात बैठक घेण्याचे नियोजन एमआयडीसीचे मुख्य अभियंता (पुणे) सुभाष तुपे यांनी केले आहे. पुणे येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर यांच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीला छोट्या व मध्यम उद्योगांचे प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड महापालिका, एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि एमसीसीआयएचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय कोतवाड यांनी दिली.