मुंबई- गेल्याच आठवड्यात म्यन्यूफॅक्चरींग क्षेत्राची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची आकडेवारी जाहीर झाली असतानाच आता सेवा क्षेत्राची उत्पादकताही उसळली असल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात सेवा क्षेत्राच्या उत्पादकतेचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पीएमआय 58.1 इतका मोजला गेला आहे. ऑक्टोबर महिन्यात हा निर्देशांक 58.4 इतका मोजला गेला होता. त्यात थोडीशी घट झाली असली तरी परिस्थिती समाधानकारक आहे. जुलै 2011 पासून प्रथमच सेवाक्षेत्राचा पीएमआय इतक्या उच्च पातळीवर कायम आहे. निर्देशांक 50 अंकांच्या वर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारत असल्याचे समजले जाते.
गेल्या चार महिन्यापासून हा निर्देशांक 50 अंकाच्या वर आहे. त्यामुळे आगामी महिन्यात हा निर्देशांक वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील उद्योजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घडामोडीचा राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीवरही सकारात्मक परिणाम झाला असून दुसऱ्या तिमाहीमध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न तब्बल 8.4 टक्क्यांनी वाढले आहे. भारत जगात सर्वात वेगाने वाढणारा देश ठरला आहे.
मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राचा एकत्रित निर्देशांक ऑक्टोबर मध्ये 58.7 होता. तो नोव्हेंबर महिन्यामध्ये 59.2 इतका नोंदला गेला आहे. त्यामुळे एकूणच आर्थिक परिस्थिती सुधारणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महागाईची चिंता
असे असले तरी डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढून कच्चामाल महाग होत आहे. त्यातच ओमायक्रॉन नावाचा करोनाचा नवा विषाणू धुमाकूळ घालत आहे. या दोन्ही बाबीचा आगामी काळात विविध क्षेत्राप्रमाणेच सेवा क्षेत्रावर परिणाम संभवतो. महागाई वाढत असल्यामुळे कामगाराच्या वेतनाचा खर्चही वाढत असल्याचे या क्षेत्रातील उद्योजकांनी सांगितले.