नवी दिल्ली – सेवा क्षेत्राची उत्पादकता जानेवारी महिन्यात वाढून सहा महिन्याच्या उच्चांकावर गेली आहे. सेवा क्षेत्राची उत्पादकता जास्त असल्यामुळे भारताची राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी सकारात्मक असल्याचे दिसून येते. जानेवारी महिन्यातील सेवा क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पीएमआय वाढून 61.8 इतका झाला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये हा निर्देशांक 59 अंकावर होता.
अगोदर सेवा क्षेत्राकडे देशांतर्गत भागातून मोठी मागणी होती. मात्र आता परदेशातूनही मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे दीर्घ पल्ल्यामध्ये आता हे क्षेत्र पूर्वपदावर आले असल्याचे दिसून येते. हा निर्देशांक 50 अंकाच्या वर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारात असल्याचे समजले जाते. गेल्या अनेक महिन्यापासून हा निर्देशांक 50 अंकाच्या वर आहे. हा निर्देशांक 50 अंकापेक्षा कमी पातळीवर असल्यानंतर हे क्षेत्र संकोचत असल्याचे समजले जाते. 400 सेवा कंपन्यांच्या पर्चेसिंग मॅनेजरबरोबर चर्चा करून हा निर्देशांक तयार केला जातो.
सेवा क्षेत्राकडे अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, युरोप, संयुक्त अमिरात आणि अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी महागाई वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्राला कच्चा माल अधिक किमतीत पडत आहे. कामगारावरील खर्च वाढला असल्याचे दिसून येते. दरम्यान सेवा क्षेत्र व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा संयुक्त निर्देशांक जानेवारी महिन्यात 61.2 वर गेला आहे. डिसेंबर महिन्यात संयुक्त निर्देशांक 58.5 इतका होता.
त्यामुळे आता ही दोन्ही क्षेत्र वेगाने वाढत असल्याचे स्पष्ट होते. व्याजदर जास्त पातळीवर असूनही आणि जागतिक परिस्थिती खराब असूनही सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढत आहे. आगामी काळात व्याजदर कमी झाल्यानंतर या क्षेत्राची उत्पादकता आणखी वाढण्यास मदत होईल असे सांगण्यात येते.