नवी दिल्ली – करोना वाढण्याची लक्षणे कमी झाल्यामुळे बहुतांश राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. उत्सवाच्या काळामध्ये नागरिकांच्या हालचालीवरील मर्यादा कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे सेवा क्षेत्राच्या उत्पादकतेत वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
सप्टेंबर महिन्यातील सेवाक्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पीएमआय 53.7 इतका मोजला गेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये हा निर्देशांक 52.3 इतका होता. हा निर्देशांक 50 अंकांवर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारत असल्याचे समजले जाते. गेल्या तीन महिन्यापासून सेवाक्षेत्राचा पीएमआय 50 अंकाच्या वर असल्यामुळे उद्योग क्षेत्रात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
सणामुळे आगामी काळात मागणी वाढणार आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारातून ही मागणी वाढत असल्यामुळे विविध उद्योग आपली उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये कर्जाचा उठाव वाढण्याची शक्यताही वाढली असल्याचे हा निर्देशांक तयार करणाऱ्या आयएएस मार्कीट या संस्थेने म्हटले आहे.
आगामी काळात वर्षभर मागणी वाढण्याची शक्यता गृहीत धरून कंपन्या आता कच्च्या मालाची खरेदी करू लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात उत्पादन वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्यामुळे आगामी काळामध्ये तयार वस्तूच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. सध्या कच्च्या मालाच्या किमती पाच महिन्याच्या उच्चांकी पातळीवर आहेत. सध्याची लवचिक परिस्थिती पाहता 8 ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणामध्ये व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण महागाई अजूनही हाताबाहेर गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही.