नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्यात सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढली आहे. मात्र, तरीही ती गरजेपेक्षा थोडी कमी भरली आहे.
सेवा क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर्स निर्देशांक म्हणजे पीएमआय ऑगस्ट महिन्यात 41.8 टक्के इतका आहे. हा निर्देशांक 50 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर हे क्षेत्र खात्रीने विस्तारात असल्याचे समजले जाते.
लॉकडाऊनमुळे नागरिकांना कामासाठी बाहेर जाता येत नसल्यामुळे मार्च महिन्यापासून या क्षेत्राचा निर्देशांक 50 पेक्षा कमी आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. कारण भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातील या क्षेत्राचे योगदान 70 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच पहिल्या तिमाहीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न उणे 23.8 टक्के मोजले गेले आहे.
सेवा क्षेत्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या रोजगारनिर्मितीवर परिणाम झाला आहे. उलट आहे तो रोजगार कमी झाला आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये या क्षेत्राची उत्पादकता 50 च्या जवळपास जाईल, अशी अपेक्षा विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. परवा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा पीएमआय 50 पेक्षा जास्त झाल्याची उत्साहवर्धक आकडेवारी जाहीर झाली आहे. ऑगस्ट महिन्यातील सेवा आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा संयुक्त निर्देशांक 46 इतका झाला आहे.